Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार? आणि पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्यापासून् कोण वाचणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच आज सकाळी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे घराचा नवा कॅप्टन ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण झाल्याचे समोर आले. कॅप्टन्सीचे उमेदवार निवडण्यासाठी गुरुवारी घरात एक टास्क पार पडला. या टास्कमध्ये सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य शेवटपर्यंत बसमध्ये टिकून राहिले. त्यामुळे हे चार जण कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले होते आणि यातून सूरज हा घरचा नवीन कॅप्टन बनला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवीन प्रोमो सकाळी प्रदर्शित झाल्यानंतर यात कॅप्टन्सी कार्याची झलक पाहायला मिळाली. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Captain)
कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा देताना दिसत आहे. तसंच त्याचं अभिनंदन करत असल्याचेदेखील या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. घरातील सदस्यांबरोबरच सामान्य प्रेक्षक व अनेक कलाकार मंडळींनीदेखील त्याच्या कॅप्टन्सीनिमित्त आनंद व्यक्त केला आहे. सूरजच्या अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे नवीन कॅप्टन झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा – बाप्पा शब्द चुकीचा उच्चारणाऱ्यांवर भडकली जुई गडकरी, राग व्यक्त करत म्हणाली, “बप्पा नसतं ते…”
कलर्स मराठीने शेअर केलेल्या सूरज चव्हाणच्या कॅप्टन्सीच्या प्रोमोखाली अनेक नेटकऱ्यांनी व कलाकारांनी शुभेच्छा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. या प्रोमोखाली अभिनेत्री व ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक मेघा धाडेने “सूरज कॅप्टन झाला” असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे. तर तृप्ती देसाई यांनी “त्याला सगळे निर्णय घेता येत नाही असे म्हणत होते, आता तोच कॅप्टन झाला आहे. सगळे निर्णय तोच घेणार, त्याला सगळ्यात कमकुवत समजणारे फक्त आता बघत बसणार, सुरज तुमचं मनापासून अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. तसंच विशाल निकम या अभिनेत्यानेदेखील सूरजच्या कॅप्टन्सीवर “ईशय हार्ड” अशी हटके कमेंट केली आहे.

वैभव घुगे या डान्स कोरिओग्राफरने “सूरजसाठी खूप आनंदी आहे” असं म्हणत “सूरजलादेखील आता इन्स्टाग्रामवरील ब्लु टिक मिळाली पाहिजे” अशी मागणी केली आहे. तसंच त्याच्या चाहत्यांनी या प्रोमोखाली “भारी वाटलं सुरज चव्हाण कॅप्टन झाला”, “फ्लॉवर समझा है क्या फायर है फायर झूकेगा नही साला. आमचा हिरो सूरज चव्हाण”, “भावा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे तुला”, “खरंच गणपती बाप्पाना भाऊ मानतो सूरज आणि गणरायाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर सूरज कॅप्टन झाला आहे” अशा अनेक कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.