‘बिग बॉस’च्या शो संपल्यानंतर सगळ्यांचा आपापला प्रवास सुरु होतो. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो. असं असलं तरी ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर त्यांची मैत्री जपताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन जिंकणारा सूरज चव्हाण हा तसा सर्वांचाच लाडका. या शोनिमित्ताने त्याचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध झाले. पॅडी, अंकिता, डीपी, निक्की यांच्यासह त्याचं जान्हवीबरोबरही खूप जमलं. अशातच नुकतंच तिने सूरजच्या गावी जात भाऊबीज साजरी केली. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली होती. त्यानंतर आता दिवाळीत, भाऊबीजेच्या निमित्ताने ती पुन्हा त्याच्या घरी पोहोचली. (Janhavi Killekar Went Suraj Chavan Village)
यावेळी जान्हवीने सूरजची भेट घेत त्याच्या शेतातही फेरफटका मारला. दोघांचा शेतातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूरज व जान्हवी या दोघांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात जान्हवी सूरजच्या शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. गुलाबी ड्रेस घालून जान्हवी किल्लेकर सूरजच्या शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. सूरज व जान्हवी शेतात धम्माल करताना दिसत आहेत. सूरजदेखील भाऊबीजेसाठी कुर्ता व पायजमा घालून खास तयार झाल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
“रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील का?” या खास गाण्यावर दोघांनी हा रील व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. “जान्हवी खरंच खूप प्रेमळ आहे”, “छान व्हिडीओ”, “टॉप क्लास”, “सुंदर जोडी”, कडक”, “ “दोघांची जोडी भारी आणि अशी राहूदे कायमस्वरूपी” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, भाऊबीजेनिमित्त जान्हवी किल्लेकर तिचा लेक, पती किरण किल्लेकर् यांच्याबरोबर गेली होती. यावेळी जान्हवीने लाडक्या भावाला मिठी मारत त्याची भेट घेतली तसेच त्याची विचारपूसदेखील केली. भाऊबीजेसाठी नक्की गावी येईन असा शब्द जान्हवीने सूरजला दिला होता आणि तिने हा शब्द खरा करून दाखवला आहे.