Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमिअर सोहळा २८ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ‘बिग बॉस’च्या घरात अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सनी प्रवेश केला. तसंच या घरात परदेसी गर्लनेदेखील तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजात ‘बिग बॉस मराठी’मध्ये ग्रँड एन्ट्री केली होती. परदेसी गर्लचा प्रोमो शेअर केल्याबरोबर नेटकऱ्यांनी ती इरिना रुडाकोवा असल्याचा अंदाज लावला होता. ग्रँड प्रिमिअरमध्ये इरिनाने एन्ट्री करताच तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इरिनाही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. इरिनाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर नुकतीच ती एका मराठी रॅप सॉन्गमध्ये झळकली होती. त्यानंतर ती मराठी इंडस्ट्रीतही लोकप्रिय झाली. (Bigg Boss Marathi 5 fame Irina Rudakova Serial)
कलर्स मराठीवर सध्या ‘इंद्रायणी’ ही मालिका जोरदार सुरु आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील छोटी इंदू आपल्या निरागस अभिनयाने सर्वांची मनं जिंकत आहे. अशातच आता यात बिग बॉस मराठी फेम इरीना रुडाकोवाची एन्ट्री होणार आहे. नुकताच तिच्या या एन्ट्रीचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये इरीना इंद्रायणीच्या शोधात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर ती इंद्रायणीला भेटताच “राम कृष्ण हरी” असंही म्हणते. मालिकेतील इरीनाच्या एन्ट्रीमुळे तिच्या चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरीना चांगलीच गाजली, तिच्या मराठी बोलण्याच्या व मराठी शिकण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ती टास्कही उत्तम खेळली. मात्र चौथ्या आठवड्यात या घरातील तिचा प्रवास संपला. पण मोजक्या दिवसांतही तिने बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर आता इरीना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी या वाहिनीद्वारेच पुन्हा ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की…
दरम्यान, इरिनाबद्दल बोलायचे झाले तर ‘इरा राय’ या नावाने तिचे सोशल मीडियावर अकाउंट असून दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्सही आहेत. ती ‘छोटी सरदारनी’ या हिंदी मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. इरीना ‘आयपीएल’पासून चर्चेत आली आहे. तिने ‘आयपीएल’मध्ये हैदराबाद संघाकडून चिअर लीडर म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर इरिना योग प्रशिक्षकसुद्धा आहे. अशातच आता ती अभिनेत्रीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.