अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली. त्या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांबरोबर वाद घातल्यामुळे कुस्तीगीर परिषदेने महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. तर उपांत्य फेरीतही असाच वाद पाहायला मिळाला होता. उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात ४० सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. (Dhananjay Powar on Maharashtra Kesari 2025)
पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यांनी पंचांशी वाद घातला. तर शिवराजने एका पंचाला लाथदेखील घातली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता याबद्दल ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक धनंजय पोवार यांनीही त्यांची भूमिका व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Grammy 2025 Award Winners List : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचा बोलबाला, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
धनंजय यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत असं म्हटलं आहे की, “कोणत्याही गोष्टीच समर्थन नाही करत. पण निर्णय चुकला आहे असे राक्षे यांचे मत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे जे हावभाव होते, ते एक खेळाडूलाच समजतील”. यासह त्यांनी “इतकी वर्षे मेहनत करुन असा पराभव कोणत्या खेळाडूला आवडेल?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे आणि पुढे त्यांनी चाहत्यांना “न्याय झाला की अन्याय झाला” असा प्रश्नही विचारला आहे.
आणखी वाचा – Video : प्रचंड वेदना असतानाही सोनू निगमने केला शो, गायकाला चालताही येईना अन्…; व्हिडीओ व्हायरल
‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारल्याचा आरोप होत आहे. पंचांचा निर्णय मान्य न झाल्यानं शिवराज राक्षेनं हे कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र, हे सर्व आरोप शिवराज राक्षेनं फेटाळून लावले.