‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. या सीझनमध्ये घरातील नियम मोडण्यापासून ते हिंसक होण्यापर्यंत सदस्यांकडून सीमा पार झाल्या. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्कीच्या कानाखाली मारल्याने आर्या जाधवला तर ‘बिग बॉस’ने थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आर्याला खेळ अर्धवटच सोडून ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट घ्यावी लागली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्या अधिक लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस’च्या घरातील वागणुकीबद्दल तिला बाहेरच रस्ता दाखवण्यात आला असला तरी बाहेर येताच अनेकांनी तिच्या या वागण्याचे कौतुक केले. (Ankita Walawalkar and Dhananjay Powar wished Aarya Jadhao)
‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर नुकतंच तिने निक्कीचे एक आव्हानही स्वीकारलं होतं. यामुळेही आर्या चर्चेत आली होती. अशातच आज तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या अनेक चाहते मंडळींसह ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांनीही तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिता वालावलकर, तिचा होणारा नवरा व धनंजय पोवार यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आर्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
आर्याने या व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत या सर्वांचे आभार मानले आहेत. या स्क्रीनशॉटसह तिने असं म्हटलं आहे की, “माझी बिग बॉसची गँग (अंकिता वालावलकर व धनंजय पोवार) आणि माझे जीजू (कुणाल भगत) यांनी माझा वाढदिवस आणखी खास बनवला”. आर्या जाधव ही मुळची अमरावतीची आहे. तिनं रॅप शो ‘हसल 2’ मध्ये सहभाग घेऊन आपली ओळख बनवली. रॅपमध्ये तिचा मराठी तडका लोकांच्या पसंतीस उतरला आणि ती व्हायरल झाली.
या शोमधील तिचे नऊवारी साडी ही गाणं चांगलच गाजलं होतं. यामुळे आर्या चांगलीच लोकप्रिय झाली होती. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या शोनंतर तिने ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये सहभाग घेतला. आर्या जाधव ही उद्योजक हेमंत जाधव यांची मुलगी आहे. आर्याचा स्वतःचा बॅंडदेखील आहे. QKनावाचा तिचा स्वतःचा बॅंड आहे. जो युट्यूबवर रॅप, गाणी करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.