‘बिग बॉस मराठी ५’ संपून आता इतके दिवस झाले असले तर या शो मधील स्पर्धकांची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. या घरातील स्पर्धकांमध्ये चांगली मैत्री झाली होती. यापैकी टीम बीची मैत्री प्रेक्षकांनीही अनुभवली. केवळ घरातच नाही तर घराबाहेरही यांची मैत्री गाजली. पण आता अंकिता वालावलकर व सूरज चव्हाण यांच्या मैत्रीत कुठे तरी मिठाचा खडा पडला आहे. दोघांमध्ये काही तरी बिनसले असल्याचे चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून होत आहे आणि यावर अंकिताने स्पष्टीकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता सूरजच्या गावी पोहोचली होती, तेव्हा सूरज आणि तिची भेट होण्यास काहीसा उशीर झाला होता. याचा व्हिडीओ अंकिताने शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरातला सूरज आणि आता बाहेर आल्यावर वागणारा सूरज यांत फरक वाटत असल्याचेही तिने म्हटलं होतं. (Ankita Walawalkar On Suraj Chavan)
त्याचबरोबर या भेटीदरम्यान, तिला काही न आवडलेल्या आणि न पेटलेल्या गोष्टींबद्दलच्या भावना तिने व्यक्त केल्या होत्या. यावेळी या संपूर्ण प्रकरणावर आपण सविस्तर बोलणार असल्याचेही तिने सांगितले होते आणि आता यावर अंकिताने तिची प्रतिक्रिया दिली आहे. अंकिताने ‘माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर’ असं शीर्षक असलेला व्हिडीओ तिच्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. यातून तिने सूरजच्या काही न पटलेल्या गोष्टींबद्दल पुराव्यासह स्पष्टीकरण दिलं आहे.
या व्हिडीओत तिने असे म्हटले की, “हा व्हिडीओ बनवण्याचे कारण म्हणजे, सूरजला मी ७० दिवस ओळखते. ‘बिग बॉस’च्या घरात आमचा ७० दिवसांचा प्रवास झाला आहे. तो मुलगा अतिशय भोळा आहे, त्याला काही गोष्टी कळत नाही. मी त्याला याकरताच नॉमिनेट करत होते की, त्याला त्याचे मत मांडता येत नाही. याच गोष्टीमुळे त्याच्या अडचणी आहेत. याकरता मला अडकवण्याचा जो प्रयत्न होत आहे, तो आता मला सहन होत नाही. त्यामुळे मी या विषयावर बोलत आहे. तुम्हाला कळले असेल की त्याला मत मांडता येत नाही. त्यामुळे तो काही गोष्टींमध्ये फसला जात आहे. तो फसला जाऊ नये असेच मला वाटते”.
आणखी वाचा – ‘अबीर गुलाल’ मालिका अचानक बंद होणार, कलाकारही भावुक, पायल जाधव म्हणाली, “वाईट वाटतं पण…”
याचबरोबर ‘बिग बॉस’ संपल्यानंतर अंकिता खूप उशिराने सूरजला भेटायला गेल्याच्या टीकेवर ती म्हणाली की, “ज्याला त्याला जसा वेळ मिळतोय, तसा तो जाऊन येतोय. मी तर आताही जाणार नव्हते, मी खूप उशिराने जाणार होते. पण मला त्याचा फोन आला की, सगळे भेटून गेले तू का आली नाहीस? आणि हे त्याचं वाक्य नव्हतं. हेदेखील त्याला कोणीतरी बोलायला लावलं. सूरजचा ज्या पद्धतीने वापर केला जात आहे, ते मला अजिबात पटलं नाही. गावी गेल्यावरही मला काही स्थानिक पत्रकारांकडून नको ते प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्रात फक्त सूरजचे फॅन्स आहेत, असं नाही. माझेही काही फॅन्स आहेत आज मी शांत बसणं म्हणजे मी माझ्या लोकांना उत्तर न देण्यासारखं आहे. म्हणून मी आज या व्हिडीओमध्ये बोलत आहे”.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजला अजित पवार बांधून देणार असल्याच्या घराबद्दल मत व्यक्त करताना असं म्हटलं की, “त्या घराबद्दल काही मागण्या समोर येत आहेत. तेव्हा मला असं वाटलं की खूप विचित्र प्रकारे या गोष्टी जात आहेत. पण याच्यामध्ये पडणं आता योग्य नाही, या सगळ्यापासून मला लांबच ठेवा”. यापुढे तिने असं म्हटलं की, “मी सूरजचं चांगलं करणार याची सर्वांना गॅरंटी आहे. तिच्या हातात सगळं गेलं तर ती सूरजला सगळं सेट करुन देईल. ते सेट न होण्याकरता हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यातून मी लांबच राहिलेली बरी. मला सूरजवर जेवढं लक्ष देता येईल, तेवढं मी देईन. पण या दलदलीमध्ये मला खरंच पडायचं नाही”