‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ आता सुरू दणक्यात सुरु झाला आहे. पहिल्या काही दिवसांत घरातील स्पर्धक छान मिळून मिसळून राहिल्यानंतर काही दिवसांनी घरचं वातावरणच बदललं आहे. त्यामुळे घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर कव पॅडी कांबळे यांचा एक ग्रुप आहे. तर दुसरीकडे निक्की तांबोळी, अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण यांचा एक ग्रुप आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून घरातील वातावरण पूर्णत: बदललं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
या घरातील डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार त्याच्या खास अंदाजाने सर्वांची मनं जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या कोल्हापूरी अंदाजानं धनंजय पोवार यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. याच जोरावर त्यांची ‘बिग बॉस मराठी’साठी निवड झाली आहे. घरात तणावाचं वातावरण असलं तर डीपी दादा त्यांच्या विनोदी शैलीने ते वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हाच स्वभाव वर्षा उसगांवकरांना आवडत नाहीये. याबद्दल डीपी यांच्या मनात खेद असून ही खेद त्यांनी घरातील अंकिता, पॅडी व अभिजीत यांच्याजवळ बोलूनही दाखवली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या मंगळवारच्या भागात डीपीने त्यांची खंत व्यक्त केली आहे. बिग बॉस मराठीमध्ये नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा यांनी त्यांच्याच टीममधील सूरज व धनंजय यांना नॉमिनेट केलं. यावेळी अंकिताने वर्षा यांनी धनंजय यांना त्यांच्या पूर्वीच्या रागामुळेच नॉमिनेट केलं असल्याचं म्हटलं. याबद्दल डीपीने असं म्हटलं की, “मी माणसे ओळखतो. त्या बाईच्या (वर्षा उसगांवकर) मनात माझ्याबद्दल भयानक राग आहे. मला त्याची तीव्रता जाणवते”.
यावर अंकिता त्यांना असं म्हणते की. “तुम्हाला माहीत असूनही तुम्ही त्यांची मस्करी का करता?” यावर डीपी असं म्हणतात की, “करणार… रडवणार त्यांना. मी या घरात असेपर्यंत त्यांना मी नडणार”. यावर अंकिता त्यांना असं म्हणते की, “तुम्हाला मागे यावं लागेल”. यावर डीपी असं म्हणतात की, “अजिबात नाही. आता मला कळायला लागलं आहे. त्यामुळे मी नडणार आहे”.
दरम्यान, वर्षा यांनी डीपी यांना नॉमिनेट केल्यामुळे अंकिता, पॅडी, अभिजीत, सूरज व आर्या यांच्यात हा संवाद चाललेला असतो की, वर्षा यांनी त्यांच्याच टीममधील लोकांना नॉमिनेट केलं नाही पाहिजे. यामुळे आपली टीम कमजोर होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि हेच म्हणणे त्यांना सांगणे गरजेचे आहे. यावेळी डीपी यांनी वर्षा यांच्याबद्दलची भावना व्यक्त केली.