Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व पहिल्या दिवसापासूनच काही ना काही कारणाने चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील वाद, भांडण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाहीत. अशातच नुकत्याच झालेल्या भागात निक्की व आर्या यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. आर्या व निक्कीमध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर आर्याने निक्कीच्या थेट कानशिलात लगावली. त्यानंतर निक्की आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी करत आहे. त्यामुळे आता आर्या घराबाहेर जाणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर शुक्रवारच्या भागात तिला जेलमध्ये टाकण्याची शिक्षा सुनावण्यात आली. ‘बिग बॉस’च्या घरात हिंसेला स्थान नसून हिंसा करु नये हा या घराचा महत्त्वाचा नियम आहे. पण याच नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे ‘बिग बॉस’ने आर्याला जेलमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली. यानंतर ‘बिग बॉस’ने सांगितलं की, आर्याला काय शिक्षा द्यायची याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखही आर्याबद्दल एक मोठा निर्णय घेणार असल्याचे दिसून येत आहे.
या प्रोमोमध्ये रितेश आर्याला तिने केलेल्या चुकीबद्दल कठोर शब्दांत सुनावत आहे. तसंच यापुढे तो ‘बिग बॉस’ला आर्याबद्दलचा अंतिम निर्णय देण्याविषयीही सांगत आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ आर्याच्या बाबतीत नक्की काय निर्णय देणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आर्याने ‘बिग बॉस’च्या घरातील निर्णय मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आर्याने निक्कीबरोबरजे काही केलं ते योग्यच आहे असं म्हणत अनेकांनी तिचे समर्थन केलं आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावुक होत म्हणाली, “आजी…”
एकाने कमेंट करत असे म्हटले आहे की, “या प्रोमोवरुन आर्याला बाहेर काढणार असल्याचे वाटत आहे, असं असेल तर आम्ही समुजन जाऊ की, तुमच्या मते लोकांच्या भावनांना काही किंमत नाही”, दुसऱ्याने असं लिहिलं आहे की, “आर्याला जर घराबाहेर काढलं तर ‘बिग बॉस’ बघणं बंद करु, ती बाहेर आली तर टीआरपीवर परिणाम होईल” तसंच आणखी एकाने “आर्याने जे काही केलं ते चुकीचे असेल तर निक्की इतके दिवस जे करत आहे ते बरोबर आहे का?” असं म्हटलं आहे.
दरम्यान, प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आर्याच्या कृतीचे समर्थन केलं असलं तरी बिग बॉसच्या घरातील मूलभूत नियमाचे उल्लंघन झाले असून याची योग्य ती शिक्षा आर्याला मिळणार आहे. त्यामुळे ही शिक्षा नेमकी काय असणार? हे आजच्या भाऊचा धक्कावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.