Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवसापासून प्रेमाचे वारे वाहू लागले होते. मात्र, आता जस-जसे दिवस पुढे जात आहेत, तसे सर्व सदस्यांचे खरे चेहरे समोर यायला लागले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात टीम A मधील कायम एकमेकांना साथ देणारे अरबाज व निक्की आता वेगळे झालेले पाहायला मिळत आहे. निक्कीच्या विरोधात त्यांच्याच ग्रुपमधील सदस्य चक्रव्ह्यूहात बोलताना आढळले. त्यामुळे निक्कीने ग्रुप A सोडण्याचा निर्णय घेतला असून सध्या ती एकटीच खेळत आहे. त्यामुळे टीम A तुटला आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात निक्कीममुळे अरबाजचा पारा चांगलाच चढला होता. निक्की व अभिजीत जेवण बनवत असतात, तेव्हा निक्की गालातल्या गालात हसत असते. ते पाहून अरबाजचा राग अनावर होतो आणि तो घरातील वस्तूंची आदळ-आपट करायला सुरुवात करतो. निक्की, अरबाजला “काय आहे हा बालिशपणा?” असं म्हणते. त्यावर अरबाज तिला म्हणतो, “तू मला हर्ट करतेय”. यावर त्यांच्यात मोठा वाद होतो. तेव्हा निक्कीही अरबाजला शांत करण्याचा प्रयत्न करते. मात्र अरबाजला तिच्या वागण्याचा भयंकर राग आलेला असतो. त्यामुळे रागाच्या भरात तो आदलाआपट करतो.
यामुळे घरातील वातावरण क्षणार्धात बदलून जातं. घरातील इतर सर्व स्पर्धक अरबाजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे निक्कीला आणखीनच राग येतो आणि ते सगळे त्याला भडकावत आहेत असं तिला वाटतं. कालच्या या राड्यावर ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदे याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्कर्षने कालच्या भांडणाचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असं म्हटलं आहे की, “बिग बॉसच्या घरात जे होतं ते फक्त निक्कीच्या अवतीभवती होतं. बाकी फक्त गर्दी”.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात काल केलेल्या आदळआपटमुळे अरबाजला याची शिक्षा मिळाली आहे. त्याने वस्तूंची केलेली तोडफोड व रागाच्या तीव्रतेमुळे त्याला आता आगामी कॅप्टन्सी टास्कमध्ये सहभागी होता येणार नाही. ‘बिग बॉस’कडून अरबाजला त्याने केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून कॅप्टन्सी पदासाठीची उमेदवारी काढून घेतली आहे. यामुळे अरबाजला खूप दु:ख होतं आणि तो रडायला लागतो.