Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये दोन्ही टीममध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. टीम B ने घरात पहिल्यांदाच डोकं लावून या टास्कमध्ये खेळी खेळली. परिणामी दोन्ही टीम्स बीबी करन्सी जिंकू शकल्या नाहीत. सदस्यांना याचे परिणाम भोगावे लागणार असा सूचक इशारा ‘बिग बॉस’ने हा टास्क संपताना सर्वांना दिला होता. “आजची रात्री शांत झोपून घ्या कारण, उद्याचा दिवस सोपा नसेल” असं ‘बिग बॉस’ने सांगितलं आणि ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कचा शेवट झाला. यानंतर ‘बिग बॉस’ने दिलेल्या सुचनेनुसार घरातील सर्वांना याचे परिणाम भोगावे लागले ते म्हणजे घरातील बेड, वॉशरुम्स व खाण्या-पिण्याचे सामान जप्त करण्यात आले. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
यानंतर ‘बिग बॉस’ अरबाजसमोर पर्याय ठेवतात. दोन्ही टीम सुख-सुविधांचा लाभ घेऊ शकतात पण, या बदल्यात तुम्हाला तुमची कॅप्टन्सी गमवावी लागेल. या टास्कमध्ये आता अरबाज दोन्ही टीमचा व घराचा विचार करत आपल्या कॅप्टन्सीवर पाणी सोडतो. त्यानंतर अरबाज आपली कॅप्टन्सी निक्कीला देतो. आपली कॅप्टन्सी सोडल्यामुळे अरबाजला दोन लाख रुपये बीबी करन्सी मिळते. यात सगळे स्पर्धक घरातील आवश्यक ते सामान घेतात. यानंतर आता घरात नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. या नवीन टास्कमध्ये घरातील इतर स्पर्धक आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी घरातील इतर स्पर्धकांना नॉमिनेट करणार आहेत.
या नवीन नॉमिनेशन टास्कचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील सदस्यांना त्यांच्या गळ्यातील एका सदस्याचा फोटो चुलीत टाकून त्यांना नॉमिनेट करण्याचं योग्य ते कारण द्यायचे आहे. यामध्ये प्रत्येक सदस्य आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी इतर स्पर्धकांना नॉमिनेट करणार आहे. या टास्कमध्ये घरातील स्पर्धकांची बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या घरातील कोणता स्पर्धक आपल्या प्रतिस्पर्ध्याला नॉमिनेट करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात अरबाजने निक्कीला तिच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आपली कॅप्टन्सी दिली. यामुळे तिच्या टीममधील जान्हवी व वैभव यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाले होते. अशातच निक्की या नॉमिनेशन टास्कपासून सुरक्षित आहे. त्यामुळे आता नॉमिनेशन टास्कमध्ये कोण सुरक्षित होणार? आणि कोण नॉमिनेशनच्या प्रक्रियेत राहणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.