Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला. याबद्दल ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहे. सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने विरुद्ध टीमसोबत दोन हात केले. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनाही त्याचा खेळ आवडला असून, शनिवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेशही त्याचं कौतुक करताना दिसेल. (Bigg Boss Marathi 5 daily update)
भाऊच्या धक्क्यावर सूरजबद्दल रितेश म्हणतो की,”या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली”. यावेळी रितेश सूरजचं कौतुक करत म्हणाला की, “झुंड में तो भेडियां आती हैं…” आणि त्याचं हेच वाक्य पूर्ण करत सूरज म्हणाला की, ” लेकीन शेर अकेला आता है!” तसंच रितेश पुढे म्हणाला की, “तीन आठवड्यात पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. निक्की आणि जान्हवीदेखील घाबरलेल्या दिसून आल्या होत्या’.
तेव्हा निक्की रितेशचं वाक्य मध्येच टोकत असं म्हणाली की “आम्ही त्याला घाबरलो नव्हतो, तर ती एक आमची Strategy (रणनीती) होती. आम्ही सूरजचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणून मी अरबाज अरबाज म्हणूण् ओरडत होते. जेणेकडून सूरज आमच्या इथे येणार नाही आणि आम्हाला हेही माहीत होतं की तो आम्हाला हात लावणार नाही”.
यावर रितेश निक्कीला “का?” असा प्रश्न विचारतात. तेव्हा निक्कीकडे उत्तर नसतं. पण याच प्रश्नावर रितेश असं म्हणतो की, “कारण तो एक संस्कारी मुलगा आहे”. त्याच्या याच वाक्यावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गडगडाट केला जातो. तसंच रितेश पुढे म्हणतो की, “कोणालाही कमी लेखू नये. हे या आठवड्यात सिद्ध झालं आहे. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका.” सूरजला बिनधास्त खेळण्याचा सल्ला रितेशने दिला.
आणखी वाचा – ‘सुंदरी’ मालिकेनंतर आरती बिराजदारची नवी भूमिका, ‘पाऊस’ वेबसीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, या टास्कनंतर सूरजने स्वत: निक्की व जान्हवी यांची किचनमध्ये जाऊन माफी मागितली होती. यावेळी निक्कीने त्याच्या वागण्यावर मी घाबरली असल्याचे म्हटलं होतं. तेव्हा सूरजनेही तिला असं म्हटलं होतं की, “मी कोणत्याही स्त्री जवळ जात नाही. टास्कसाठी मी केलं असेन. पण मी स्त्रियांपासून अंतर राखूनचं असतो” आणि त्याच्या याच कृतीचं सर्वत्र कौतुक झालं होतं. आशातच काल रितेशनेही त्याच्या संस्कारांचं पुन्हा एकदा कौतुक केलं.