Itsmajja Paus Series : मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री आरती बिराजदार. ‘सुंदरी’ या लोकप्रिय मालिकेद्वारे तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. या मालिकेत तिची मुख्य व लक्षवेधी भूमिका होती. या मालिकेत आरतीने कलेक्टरची भूमिका साकारली. या मालिकेतील अभिनयाने आरतीने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सुंदरी’ मालिकेत आरती ही कलेक्टरच्या भूमिकेत होती. त्यामुळे एक सुशिक्षित, जबाबदार, आपल्या कुटुंबासाठी जगणारी आणि सर्वांना सांभाळून घेणारी अशी तिची भूमिका होती. या मालिकेनंतर आरती आता एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘पाऊस’ या वेबसीरिजमधून आरती पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘पाऊस’ या वेबसीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. (Itsmajja Paus Series News)
‘सुंदरी’ मालिकेतील कर्तबगार व कर्तव्यनिष्ठ कलेक्टरची भूमिका साकारल्यानंतर आरती आता ‘पाऊस’च्या निमित्ताने ग्रामीण भागातील एका गावातल्या साध्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या सीरिजमध्ये आरतीला अभिनेता अक्षय खैरेची साथ मिळणार आहे. अक्षय खैरे हे नावसुद्धा आजवर अनेक मालिकांमधून छोट्या-मोठ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पाऊस’ ही सीरिज आरती व अक्षय या मुख्य दोन भूमिकांबद्दल असली तरी या सीरिजमध्ये इतर अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. या सीरिजमध्ये ‘देवमाणूस’ या गाजलेल्या मालिकेतल्या सरू आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार यासुद्धा पाहायला मिळणार आहेत. या सीरिजनिमित्ताने सरू आजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे ‘पाऊस’ या सीरिजसाठी व या सीरिजमधील कलाकारांच्या आगामी भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
‘पाऊस’ या नवीन सीरिजमधून ‘इट्स मज्जा’ एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येत आहे. ‘पाऊस’ आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं आहे. प्रत्येकाच्या प्रेमकहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी ‘पाऊस’ हा महत्वाचा असतो. याच ‘पाऊस’चं आणि प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणारी नवीन वेबसीरिज आपल्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या ट्रेलरमधून पाऊस, प्रेम व प्रेम करणारी दोन माणसं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘पाऊस’ची कथा व दिग्दर्शन ‘इट्स मज्जा’च्याच गाजलेल्या ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांनी केलं आहे. या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी सांभाळली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. प्रेम, पाऊस आणि या दोघांमधला गोडवा व दुरावा या सीरिजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि हा अनुभव म्हणजेच ‘पाऊस’ ही सीरिज येत्या १९ ऑगस्टपासून ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.