Kranti Redkar Birthday : अभिनेत्री, निर्माती क्रांती रेडकर सध्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून झळकत असते. काल १७ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्ता तिला अनेक कलाकारांनी व तिच्या चाहत्यांनी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या. अभिनेत्रीने तिचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या जन्मदिनानिमित्त गोरगरिबांना अन्नदान करत हा खास दिवस साजरा केला आहे. क्रांती रेडकरही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोहल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्याबरोबरच ती तिच्या लेकींचे अनेक व्हिडीओही शेअर करत असते. अशातच तिच्या एका नवीन व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Kranti Redkar Birthday Video)
क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिचा वाढदिवस कसा साजरा केला हे दिसून येत आहे. अभिनेत्रीने वाढदिवसाला अन्नदान केलं असून या अन्नदान केल्याची खास झलक तिने शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्वत:च्या हाताने अन्नदान करत असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. अन्नदान केल्यानंतर तिथेच क्रांतीने केक कट केला आणि मग क्रांती तिच्या लेकींबरोबर तिच्या आई-वडिलांकडे गेली. त्यानंतर आई-वडिलांना नमस्कार करत तिने आपला खास दिवस साजरा केला. तसंच त्यानंतर पतीबरोबरही आपला वाढदिवस साजरा केला. या संपूर्ण दिवसाची झलक क्रांतीने या व्हिडीओमधून दाखवली आहे.
हा खास व्हिडीओ शेअर करत क्रांतीने असं म्हटलं आहे की, “तुमच्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद, काल माझा दिवस सुंदर होता. माझा दिवस इतका खास बनवणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप आभार”. याचबरोबर क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओखालीही अनेक चाहत्यांनी तिच्या या अन्नदान केलेल्या कृतीचे कौतुक केलं आहे. “तुम्ही वाढदिवस साजरा नाही केला. तर सत्कारणी लावला”, “म्हणुन तुम्ही माझ्या favorite आहात”, “खूप सुखी राहा”, “खरच खुप कौतुकास्पद आहे” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी क्रांतीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षापासून क्रांतीने अभिनयातून ब्रेक घेतला. अभिनय सोडल्यानंतर क्रांतीने निर्माती म्हणूनही काम केलं. पण जुळ्या मुली झाल्यानंतर त्यांच्यासाठी क्रांतीने सगळ्याच कामातून विश्रांती घेतली. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावरून क्रांती गायब असली तरी क्रांतीने सोशल मीडियावर चांगलाच जम बसवला. क्रांतीचे सोशल मीडियावर लाखांमध्ये फॉलोअर्स आहेत.