Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अगदी उद्यावर या सीझनचा महाअंतिम सोहळा येऊन पोहोचला आहे. या सीझनमध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता आणि यापैकी चर्चेतलं नाव म्हणजे अभिजीत सावंत. छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल’चा विजेता असलेल्या अभिजीत सावंतने सुरेल आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्याचा खेळ पाहून प्रेक्षक त्याच्या जिद्दीचं आणि चिकाटीचं कौतुक करत आहेत. अशातच बॉलिवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनीदेखील अभिजीतच्या खेळाचे कौतुक केलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. घरातील आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सर्वजण प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. यामध्ये अभिजीतच्या अनेक मित्रमंडळींनी त्याला खास व्हिडीओ शेअर करत पाठिंबा दिला आहे. यामध्ये ‘कपिल शर्मा शो’ फेम सुनील ग्रोव्हर, बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे, गायक राहुल वैद्य व आकाश अझीज, संगीतकार सलीम मर्चंट, फराह खान यांनी पाठिंबा दिला आहे.
तसंच मराठी अभिनेत्री व ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक मीरा जगन्नाथ, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अथर्व सुदामे यांनीही व्हिडीओ शेअर करत अभिजीला पाठिंबा दिला आहे. “आपल्या सर्वांचा लाडका अभिजीत सावंत आता ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्याला जिंकवण्यासाठी तुम्ही सर्वांनी भरभरून मत करा आणि त्याला जिंकवून द्या” अशा आशयाचे व्हिडीओ शेअर करत सर्वांनी अभिजीतला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
७० दिवस प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यावर ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ६ ऑक्टोबर रोजी या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दोन आठवड्यांपासून गैरहजर असलेला होस्ट रितेश देशमुख या सोहळ्याला हजर असणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ब्लॉकबस्टर पाचव्या पर्वाच्या विजेतेपदाची ट्रॉफी कोणता सदस्य उचलणार हे रविवारी स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या चाहते या महाअंतिम सोहळ्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.