Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या ६ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा ग्रँड फिनाले अगदी दिमाखात पार पडणार आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरात शेवटचे सहा फायनलिस्ट उरले आहेत. निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे सहा स्पर्धक असून यापैकी कोणत्या स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील सहा स्पर्धकांना पाठिंबा व शुभेच्छा देण्यासाठी घरात या पर्वातील सर्व एलिमिनेटेड सदस्य घरात प्रवेश घेणार आहेत. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.
बिग बॉस मराठी ५ चा नवीन प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने शेअर केला आहे. त्यात घरातील टॉप ६ सदस्य बाहेर गेलेल्या सर्व स्पर्धकांना पाहून आनंदी होतात. या प्रोमोमध्ये घरातून बाहेर पडलेले सदस्य दिसत आहेत, पण त्यापैकी एका सदस्याला बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रोमो पाहून विशेष चर्चा रंगलेली दिसत आहे. रुषोत्तमदादा पाटील, घनश्याम दरवडे, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, वर्षा उसगांवकर, संग्राम चौगुले, पंढरीनाथ कांबळे, अरबाज पटेल, योगिता चव्हाण, निखिल दामले यांची घरात एन्ट्री होताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पण या सर्वांमध्ये एक सदस्य दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी निक्कीला कानशिलात मारलेली आर्या जाधव ही स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात आलेली दिसत नाही आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आर्याच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारला आहे. एका टास्कदरम्यान निक्की व आर्या यांच्यात वाजलं आणि त्याचवेळी रागाच्या भरात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. त्यानंतर ‘बिग बॉस’ने आर्याला दोन दिवस जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. त्यानंतर झालेल्या भाऊच्या धक्क्यावर आर्याला घरातून बाहेर काढलं.

आर्याला कुणालाही न भेटू देता घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर आता रियुनियनमध्येही आर्या काही ‘बिग बॉस’मध्ये आल्याचं दिसत नाही हे पाहून नेटकऱ्यांनी प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत. “आता लहान मुले हा शो बघत नाहीत का?, आर्याने कानाखाली मारली तेव्हा लहान मुलं हा शो बघत होते आणि हे असले नको ते चाळे तुम्ही दाखवता तेव्हा लहान मूल बघत नाहीत का?. हे असे नको ते चाळे दाखवून आमच्या लहान मुलांवर नको ते संस्कार आणि नको ते परिणाम होतील”, “आर्याला बोलावलं नाही का?”, “आर्याला का नाही बोलावलं. ‘बिग बॉस’ घाबरता का?, कसले तुमचे नियम जरा बदला”, अशा कमेंट करत आर्या न येण्यावरुन सवाल केला आहे.