Big Boss 18 : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकिल गुणरत्न सदावर्ते आता ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहेत. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा असतानाच ‘हिंदी बिग बॉस १८’चीदेखील जोरदार चर्चा सुरु आहे. या घरात कोणाला एन्ट्री मिळणार?, सलमान खानबरोबर कोण पंगा घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच एक नाव समोर आलं आहे. डंके की चोटपर म्हणणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ‘बिग बॉस हिंदी १८’ च्या घराचं तिकीट मिळालं आहे गुणरत्न सदावर्तेंनीही याबाबत दुजोरा दिला असून त्यांच्या एन्ट्रीचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. (Gunaratna Sadavarte in Bigg Boss 18)
सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात झळकणाऱ्यांचे दमदार प्रोमो समोर येत आहेत. पहिला प्रोमो ९०च्या दशकातील बोल्ड आणि सेन्सेशनल क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शिरोडकर यांचा आला. मग ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील शेहजादा धामी याचा दुसरा प्रोमो आला. त्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये “हम आते हैं डाकू की खानदान से” म्हणत गुणरत्न सदावर्ते स्टेजवर एन्ट्री करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे आणि त्यांच्या डायलॉगबाजीमुळे सलमान खानलाही हसू अनावर झालं आहे.
आणखी वाचा – हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अक्षयाची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “माझ्या हास्याचे कारण…”
याआधी एका गाढवाचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये एक गाढव ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमिअरला चारा खाताना दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. पण हे पाळीव गाढव आहे; जे गुणरत्न सदावर्तेचं आहे. सदावर्ते यांची मुलगी झेन हीला प्राण्यांची आवड आहे. यामुळेच त्यांनी घरी गाढव पाळले आहे. सदावर्ते यांच्या या गाढवाचे नाव ‘मॅक्स’ असून सदावर्ते या गाढवाबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये निया शर्मा नसणार? पोस्टद्वारे स्वत: केला खुलासा, म्हणाली, “मला दोष देऊ नका कारण…”
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या आधी ‘बिग बॉस’ हिंदीमध्ये अभिजीत बिचुकले दिसले होते. त्यावेळी अभिजीत बिचुकलेनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते या सीझनमध्ये काय गंमत आणणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. आज रविवार रात्री ९ वाजल्यापासून ‘बिग बॉस १८’ चा ग्रँड प्रीमिअर सोहळा रंगणार असून यंदा या शोचे होस्टिंग सलमान खान करणार आहे. त्यामुके आजपासून सुरु होणाऱ्या या ‘बिग बॉस’च्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.