‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळाली. या मालिकेच्या कथानकाने व मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने चाहत्यांच्या मनात आपली जागा मिळवली. सोशल मीडियावरही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.(Jahnavi Killekar Incident)
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या घरात झालेल्या चोरीबाबत भाष्य केलं आहे. घरात झालेली चोरी आणि ते पाहून आईला आलेला अटॅक ही सर्व परिस्थिती तिने या व्हिडीओमधून सांगितली आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने असं म्हटलं की, “नमस्कार, मी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. आज व्हिडीओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की माझं पेणमध्ये एक घर आहे. छोटासा बंगला आम्ही तिथे बांधला आहे. पण ते आमचं विकेंड होम आहे. फक्त शनिवार, रविवार आम्ही तिकडे जातो. पण नुकतच माझ्या त्या पेणच्या घरात चोरी झाली आहे. चोरांनी बऱ्याचश्या मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. जशा की, आमच्या घरातले सगळे स्पीकर्स, माझ्या भावाची गिटार, माझ्या भावाचे वॉचचे कलेक्शन्स होते, हे सगळं चोरी गेलं आहे”.
पुढे तिने असं म्हटलं आहे की, “आईच्या बराचश्या साड्या चोरीला गेल्या आहेत. चोरांना ज्या गोष्टी शक्य झाल्या, ते त्यांनी नेलं. एसी काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, पण कदाचित ते त्यांना जमलं नाही. फ्रिजही हलवण्याचा प्रयत्न केला गेलाय. काही गोष्टी त्यांना न्यायला जमल्या नसतील कदाचित, म्हणून त्यांनी नेल्या नाहीत. व्हिडीओ बनवण्याचं कारण असं की, तुमचंही असं एखादं बंद घर असेल, विकेण्ड होम असेल, तर प्लीज काळजी घ्या. कारण चोरांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. म्हणजे मला असं वाटतं की, ते अगदीच नजर ठेवून असतात. या घरी कोण किती वाजता येतं, कोण असतं. या सगळ्या गोष्टींवर ते लक्ष ठेवतात आणि व्यवस्थित वेळ साधून ते चोरी करुन जातात”.
“आपण खूप आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात आणि अचानक असं सगळं झाल्यावर त्या गोष्टीचा धक्का बसतो. नक्की कोणत्या दिवशी चोरी झाली हे आम्हालाही माहित नाही. गेल्या शनिवारी जेव्हा आई-बाबा गेले होते, तेव्हा हा सगळा प्रकार आम्हाला समजला. पण माझ्या आईला या सगळ्या गोष्टींचा धक्का बसला आणि तिला पॅरालिसीसचा अटॅक आला. अजूनही ती रुग्णालयातच आहे. म्हणून तुमचंही असं बाहेर कुठे घर असेल तर काळजी घ्या”, असं म्हणत तिने सतर्कतेचा इशारा दिला आहे.