तुम्ही पाहिलात का नारकर कपलचा डान्स? अहो तेच हो नारकर कपल ज्यांना तुम्ही गेले काही दिवस सतत ट्रोल करत आहात. “साठी बुद्धी नाठी”, “माकडचाळे”, “तुम्हाला शोभतं का?” असं बरंच काही नको नको ते बोलून तुम्ही सोशल मीडियावर तोंड सुख घेत आहात तेच नारकर कपल. अर्थात तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे तरीही सांगते अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांच्याबद्दल मी बोलत आहे. दोघांचेही रिल व्हिडीओ पाहून सतत आपलं ज्ञान पाजळणाऱ्या ट्रोलर्सची मला किव येते. किंबहुना त्यांच्यावर हसू येतं. खरंच या लोकांची विचार करण्याची क्षमता इतकी कमकुवत झाली आहे का? हाही विचार हळूच मनात डोकावतो.
इन्स्टाग्रामवर सतत हजारो मंडळी रिल व्हिडीओ शेअर करतात. त्यात कित्येक सेलिब्रिटींचाही समावेश असतो. सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ न पाहण्यासारखेही असतात. मग वाढत्या वयामध्ये स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगणाऱ्या नारकर कपलवर तुमचा राग का? दोघंही उत्तम कलाकार आहेत, नावाजलेले सेलिब्रिटी आहेत म्हणून तुम्ही त्यांना सुनावणार असाल तर तुमची वैचारिक दृष्टी कमकूवत आहे.
आता तुम्ही म्हणाल आम्ही त्यांचे चाहते आहोत, एक कलाकार म्हणून आम्हीच त्यांना मोठं केलं आहे तर आम्हाला बोलायचा अधिकार आहे. अहो छे हो तुम्ही त्यांना कसंही बोलून हा अधिकार आधीच गमावला. काही दिवसांपूर्वी अविनाश नारकर गणेशोत्सवासाठी गावी गेले असताना त्यांनी सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर डान्स करताना दिसले. पण यातही तुम्ही त्यांनी या वयामध्ये ‘असं वागणं बरं नव्हे’, ‘वयाचा विचार करा’ म्हणून सल्ले दिलात. पण या वयातही दोघंही इतके फिट आहेत पाहून त्यांच्याकडून आदर्श घ्यावा असा विचार का नाही केला?
ऐश्वर्याही त्यांच्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाहीत. अविनाश यांचंही अगदी तसंच आहे. नियमित व्यायाम, योगा दोघांचंही ठरलेलं. मग व्यायाम करत असतानाचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले आणि त्यामाध्यमातून इतरांनाही व्यायाम करण्यासाठी प्रेरित केले तरी तुम्हाला ती चूक वाटते. बरं आता काहीजणं त्यांच्या या व्हिडीओचं कौतुक करतात. पण कित्येक मंडळी फक्त आणि फक्त टीकाच करतात.
आतापर्यंत ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या यांनी कमेंट्सच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे. पण एवढं करुनही ट्रोलर्स मात्र शांत बसलेले नाहीत. शूटिंगच्या गडबडीमध्ये, सतत कामात व्यग्र असताना स्वतःला आनंदी कसं ठेवायचं? हे तुम्ही या दोघांकडून शिकलं पाहिजे. फिटनेसबाबत तर तरुणाईलाही लाजवणारं हे कपल आहे. ते सेलिब्रिटी म्हणून तुम्ही त्यांना कसंही बोलता. पण आज वाढत्या वयातील मंडळींचे कित्येक ग्रुप तुम्ही सकाळी तुमच्या आजूबाजूच्या मैदानावर मॉर्निंग वॉक करताना, लाफ्टर क्लबमध्ये सहभागी होताना बघत असाल. इतकंच काय तर वयाची चाळीशी ओलांडलेल्या बऱ्याच महिला आज डान्स क्लासला जातात, योगा क्लासला जातात, विविध व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर अपलोड करतात. मग त्या महिलाही ‘माकडचाळे’ करतात का? हा प्रश्नही अनुत्तरित आहे. नारकर कपल आता ज्या वयामध्ये अगदी आनंदाने, उत्साहाने काम करतात ते तुम्हाला तरुणवयामध्ये तरी जमतंय का? किंवा वाढत्या वयामध्ये जमणार का? ते पडताळून पाहा. आणि नसेल जमत तर किमान बोलताना दहावेळा तरी विचार करा एवढीच इच्छा…