गेले काही दिवस चिन्मय मांडलेकर हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. आपल्या लेखन व अभिनय शैलीने चर्चेत राहणारा चिन्मय मांडलेकर त्याच्या काही वैयक्तिक कारणांनी चर्चेत आला आहे. अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर करत भविष्यात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे म्हटले आणि यांचे कारण म्हणजे चिन्मयच्या कुटुंबियांवर सोशल मीडियाद्वारे होणारे ट्रोलिंग.
मराठी मनोरंजन विश्वातील रवी जाधव, समीर विद्वांस, अक्षय वाघमारे, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, अश्विनी महांगडे, गौतमी व मृण्मयी देशपांडे यांनी चिन्मयच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. यासह अनेकांनी विविध माध्यमांद्वारे आपली मतं व्यक्त केली आहेत, अजूनही करत आहेत. यावर आता गायक, गीतकार, संगीतकार व दिग्दर्शक अवधूत गुप्तेनेही आपलं मत मांडलं आहे. अवधूतने चिन्मयच्या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये त्याचे मत व्यक्त केलं आहे.

या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “चिन्मय… मित्रा! तुझी पोस्ट आणि त्याबद्दलची चर्चा वाचून वाईटदेखील वाटलं आणि काळजीदेखील वाटली. म्हणून तुला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, तू फोन बंद करून बसलेला दिसतोस. तर, आता इथेच समजूत काढावी लागणार. कुठल्या भूमिका कराव्यात आणि कुठल्या करणे थांबवावे, हा सर्वस्वी कलाकाराचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे, तुझा निर्णय मान्य आहे. परंतु, ज्या कारणामुळे तू हा निर्णय घेतला आहेस, ते खूप दुर्दैवी आहे.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “‘झेंडा’ आणि ‘मोरया’ चित्रपटांच्या वेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून वाघासारखा उभा राहिलेला चिन्मय हाच का? मित्रा, तुला ट्रोल करणाऱ्या लोकांना ‘स्थळ, काळ आणि वेळ‘ सांगून एखाद्या ठिकाणी बोलव आणि त्यातली पाच माणसं जरी आली, तरी त्यांचा सत्कार करून तुझा निर्णय घे.”
यापुढे अवधूतने चिन्मयबद्दल काळजी व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “टाईमपासला टॉयलेट सीटवर बसून केलेल्या निर्बुद्ध कमेंट्सवर आपल्या करिअरचे महत्त्वपूर्ण निर्णय अवलंबून ठेवणे हे शहाणपणाचे आहे का? बाकी. मी तुझा मनस्ताप समजू शकतो. काळजी घे. लवकरच भेटू.”