मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या वेबसीरिजचे चांगलेच प्रस्त वाढले आहे. अनेक ओटीटी माध्यमांवर अनेक प्रकारचे चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत आहेत. याशिवाय युट्यूबद्वारेही अनेक सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशातच युट्यूबवर एका वेबसीरिजने सध्या अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोणताही ओळखीचा चेहरा न घेता केवळ कथानकाच्या आणि नवोदित कलाकारांच्या उत्तम अभिनयाने नटलेल्या या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे आणि ही लोकप्रिय वेबसीरिज म्हणजेच ‘आठवी अ’.
‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ आणि ‘इट्स मज्जा’ ओरिजनल नेहमीच प्रेक्षकांसाठी आशयघन व मनोरंजक गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. यापैकीच ‘आठवी अ’ ही सीरिज आहे. या वेबसीरिजच्या भरघोस प्रतिसादाबरोबर आता ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ व ‘इट्स मज्जा’ चाहत्यांसाठी आणखी एक नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे आणि या सीरिजचे नाव आहे ‘रस्त्यावरची शाळा’. गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर या सीरिजची घोषणा करण्यात आली होती आणि अशातच आता या सीरिजचे पोस्टरदेखील प्रदर्शित झाले आहे.
गावखेड्यातील ऊसतोड कामगार, विटभट्टीवरील कामगार, रस्तेकामगार यासह ज्या मुलांची शाळेत जाण्याची आर्थिक स्थिती नाही. ज्या मुलांना काही कारणास्तव शाळेत जाता येत नाही. अशा मुलांसाठी रस्त्यावर शाळा उभारण्यात येते. त्या रस्त्यावरच्या शाळेत मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होते?, त्यांना या शाळेत नेमके काय आणि कसे शिकवले जाते? यावर या सीरिजचे कथानक भाष्य करणार आहे.
नुकतंच या सीरिजचे पोस्टर शेअर करण्यात आले असून हे पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. मीडिया वन सोल्यूशन्स प्रस्तुत, इट्स मज्जा ओरिजिनल व कोरी पाटी प्रॉडक्शन च्या ‘रस्त्यावरची शाळा’ या सीरिजचे दिग्दर्शक हे नितीन पवार आहेत. दरम्यान, ‘आठवी अ’ला मिळालेल्या भरभरुन प्रतिसादाबरोबर ‘रस्त्यावरची शाळा’ ही नवी कोरी वेबसीरिजही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे.