Nitin Desai Suicide Case : सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. शवविच्छेदन अहवालामध्येही त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं. नितीन देसाई आत्महत्याप्रकरणाला आता राजकीय वळणही मिळालं आहे. शिवाय आर्थिक अडचणीमुळे हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचंही बोललं जात आहे. मात्र अजूनही नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागचं खरं कारण समोर आलेलं नाही. दरम्यान एनडी स्टुडिओच्या एका कर्मचाऱ्याने नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर नेमकं काय घडलं? त्यांनी लिहून ठेवलेल्या चिट्ठीबाबत काही खुलासे केले. (Nitin Desai Last Wish)
एनडी स्टुडिओचा कर्मचारी मयुर ठोंबरने पहिल्यांदा नितीन देसाई यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर मयुरला मोठा धक्का बसला. ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना त्याने याबाबत भाष्य केलं. तसेच नितीन देसाईंनी आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली असल्याचंही त्याने सांगितलं. याच चिट्ठीमध्ये त्यांनी त्यांची शेवटची इच्छा सांगितली.
मयुर ठोंबरे म्हणाला, “नितीन देसाई यांनी एक चिट्ठी लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, माझा अंतिम विधी हा एनडी स्टुडिओमध्येच व्हावा. स्टुडिओमध्येच सहा नंबरच्या ग्राऊंडवर हॅलिपॅड आहे तिथेच नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील”.
आज सायंकाळी चार वाजता एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विशेष म्हणजेच त्यांनी उभारलेला भव्यदिव्य ‘जोधा अकबर’ सेटवर नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. एनडी स्टुडिओमध्ये आज सकाळपासूनच अनेकांनी नितीन देसाईंना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.