उद्या सर्वत्र ‘मदर्स डे’ म्हणजेच ‘मातृदिन’ साजरा केला जाणार आहे. यंदा १२ मे रोजी सर्वत्र ‘मदर्स डे’ साजरा केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आईसाठी हा दिवस खास करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी मालिकांमध्येही उद्याचा ‘मदर्स डे’ साजरा करण्यात येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतही ‘मदर्स डे’ साजरा करण्यात येणार आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतल्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. या नवीन कथानकात अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल याचीही एंट्रीही झाली आहे. त्यामुळे अप्पी व अमोलची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या लीपमुळे अमोल व अर्जुन यांची ताटातुट झाली असून अर्जुन व अमोल कधी एकत्र येणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
अशातच या मालिकेचा ‘मदर्स डे’ स्पेशल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि यामध्ये अमोल व अर्जुन मिळून अप्पीसाठी खास ग्रिटींग कार्ड बनवतानाचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अर्जुन अमोलला “आपण तुझ्यासाठी एक मस्त गिफ्ट तयार करु” असं म्हणतो. यानंतर दोघे मिळून “माझ्या सर्वोत्कृष्ट आईसाठी खास भेट” लिहिलेलं छान ग्रिटींग कार्ड तयार करतात. हे ग्रिटींग पाहून अप्पीही खुश होत असल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या व्हिडीओला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अर्जुन व अमोल यांनी बनवलेले हे छान गिफ्ट अप्पीला आवडणार का? अप्पीला कळेल का की हे गिफ्ट अर्जुननेच बनवलं आहे? किंवा अप्पी व अर्जुन अमोलमुळे एकत्र येणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.