रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’या चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नर्गिस फाखरी सध्या तिच्या बहिणीमुळे अचानक चर्चेत आली आहे. नर्सिगची बहीण आलियावर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. ४३ वर्षांच्या आलियानं कथितरित्या एका गॅरेजला आग लावली, ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आलिया फाखरीला अटक करण्यात आली आहे. (Alia Fakhri Arrested)
‘डेली न्यूज’च्या वृत्तानुसार, नर्गिस फाखरीची बहीण आलियाने न्यूयॉर्कमधील क्वीन्समध्ये एका दुमजली गॅरेजला आग लावली. या आगीत तिचा माजी प्रियकर एडवर्ड जेकब्स आणि त्याची गर्लफ्रेंड अनास्तासिया ‘स्टार’ एटीएन या दोघांचा मृत्यू झाला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी आलिया फाखरीला अटक केली आहे. सध्या आलिया पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिला कोर्टातून जामीन मिळालेला नाही.
आलियानं चुकीच्या पद्धतीनं आग लावून दोन लोकांचा जीव घेतला आहे. यामध्ये आलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा समावेश आहे. दोघांचाही आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. “आलियाने चुकून आग लावून दोन लोकांचा जीव घेतला. ज्यामुळे एक पुरुष आणि एक महिला आगीत अडकले,” असे जिल्हा वकील मेलिंडा काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. यात धुराच्या श्वासोच्छवासामुळे आणि जखमांमुळे पीडितांचा दुःखद मृत्यू झाला.
दरम्यान, नर्गिस फाखरीच्या आईनं समाचार आऊटलेटला यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी माझी मुलगी असं काहीच करू शकत नाही, असं सांगितलं. नर्गिस फाखरीच्या आईनं आलियावर लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन करत असं म्हटलं की, “मला वाटत नाही की, ती (आलिया) कुणाचीही हत्या करेल. ती सर्वांची काळजी घेणारी व्यक्ती होती. तिनं नेहमीच सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे”.
आणखी वाचा – 03 December Horoscope : वृषभ राशीच्या लोकांना मंगळवारी मेहनतीमुळे मिळेल सन्मान, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?
तर आलियाचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्डच्या आईनं एका निवेदनात म्हटलं आहे की, एडवर्ड आणि आलिया एक वर्षानंतर वेगळे झाले होते, तरीही आलिया एडवर्डचा पाठलाग करत होती. एडवर्डच्या आईनं असंही सांगितलं की, एडवर्ड आणि अनास्तासिया हे पार्टनर नसून फक्त मित्र होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी अभिनेत्री नर्गिस फाखरीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य किंवा स्पष्टीकरण आलेलं नाही.