मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसह लग्न करणार आहे. राधिका-अनंतचा भव्य लग्नसोहळा जुलैमध्ये होणार आहे. मार्च महिन्यापासून त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरु होते. मार्चमध्ये गुजरातमधील जामनगर येथे तीन दिवसांच्या भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशननंतर, अनंत-राधिका यांचा आता इटलीतील क्रूझवर दुसरा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनंत-राधिकाच्या क्रूझ पार्टीसाठी बॉलिवूडही पुढील काही दिवस बंद राहणार आहे. सलमान खानपासून ते आलिया-रणबीर कपूरपर्यंत सर्व कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी रवाना झाले आहेत. (Anant-Radhika 2nd Pre Wedding)
रणबीर कपूर व आलिया भट्ट पहिल्यांदा त्यांची मुलगी राहासह एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. आलिया व रणबीर अनेकदा अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि यावेळीही ते अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनला त्यांच्या मुलीसह हजेरी लावण्यास रवाना झाले आहेत. त्यांच्याबरोबर ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक आणि त्यांचा जिवलग मित्र अयान मुखर्जीदेखील होता. हे सर्वजण इटलीला जाण्यापूर्वी मुंबईतील एका खासगी विमानतळावर दिसले. फोटोंमध्ये रणबीर नवीन हेअरकट केलेला दिसत होता. त्याने राखाडी जॉगर्सवर मॅचिंग स्वेटशर्ट घातलं होतं. आलियानेही कॅज्युअल लूक केलेला पाहायला मिळाला. राहाबरोबर ती तिच्या आलिशान कारमधून बाहेर पडताना दिसली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत व राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग फंक्शन २८ ते ३० मेदरम्यान होणार आहे. या कार्यक्रमाला सलमान खानही उपस्थित राहणार आहे. सलमान खानही विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी भाईजान पांढऱ्या शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत होता. रणवीर सिंगही अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनलाही हजेरी लावणार आहे. रणवीर सिंगदेखील विमानतळावर काळ्या लांब जॅकेट आणि काळ्या पँटसह पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसला.
क्रिकेटर एमएस धोनीही त्याची मुलगी झिवा आणि पत्नी साक्षी धोनीसह निघाला. धोनीला त्याच्या कुटुंबासह विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यादरम्यान धोनीनेही हात दाखवत सर्वांचं स्वागत केले. सध्या सर्वजण अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी उत्सुक आहेत. इंटरनॅशनल सिंगर रेहाना व्यतिरिक्त गुजरातमध्ये झालेल्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिलजीत दोसांझ, सलमान, शाहरुख आणि आमिर खानसह अनेक कलाकारांनी खळबळ उडवून दिली होती. आता असे बोलले जात आहे की, अनंत-राधिकाच्या क्रूझ पार्टीत शकीरा परफॉर्म करु शकते. याशिवाय, पुन्हा एकदा अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील परफॉर्म करताना दिसणार आहेत.