भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची प्रेयसी राधिका मर्चंटबरोबर १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. याआधीच या जोडप्याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून सर्व सोहळे अत्यंत शाही पद्धतीने साजरे केले जात आहेत. पण या शाही लग्नासाठी मुकेश अंबानी किती पैसे खर्च करत आहेत, हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. सात फेरे घेण्यापूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे विधी सुरु आहेत. आतापर्यंत संगीत, हळदी आणि मेहंदी हे समारंभ पार पडले आहेत. (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)
यावेळी परदेशी पॉप गायक जस्टिन बीबरने आपल्या परफॉर्मन्सने शोमध्ये धुमाकूळ घातला. आता सर्वजण अनंत-राधिकाच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट १२ जुलैला म्हणजेच आज हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. १३ जुलै रोजी त्यांच्या शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम आहे आणि १४ जुलै रोजी हे जोडपे भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी २५०० हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अंबानी कुटुंबाने पाहुण्यांना नेण्यासाठी तीन फाल्कन-२००० जेट भाड्याने घेतली आहेत.
क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले की, या कार्यक्रमासाठी १०० हून अधिक खासगी विमाने वापरली जाण्याची त्यांची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानींच्या या शाही लग्नासाठी मुकेश अंबानींनी ३५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. अनंत अंबानींच्या लग्नाआधी दोन भव्य प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुजरातमधील जामनगर येथे पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये १२०० पाहुणे उपस्थित होते.
यावेळी मेटाचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि इव्हांका ट्रम्प यांसारखे परदेशातील श्रीमंत लोकही सहभागी झाले होते. पॉप सिंगर रिहानानेही आपला परफॉर्मन्स दिला. तीन दिवस चाललेल्या या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली. अनंत अंबानी आणि राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग इटली व फ्रान्स दरम्यानच्या क्रूझवर झाले. बॅकस्ट्रीट बॉईज, कॅटी पेरी, अँड्रिया बोसेली यांनी ८०० हून अधिक पाहुण्यांसह साजरा केलेल्या या कार्यक्रमात परफॉर्म केले.