आयुष्यात लग्न हे एकदाच होतं. त्यामुळे ते लग्न सर्वांच्या आयुष्यभर लक्षात रहावं असं अनेकांना वाटत असतं. त्यामुळे या खास आठवणी तयार करण्यासाठी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले जाते. यासाठी नवरा-नवरीबरोबरच लग्नात एक आणखी महत्त्वाचा माणूस असतो तो म्हणजे फोटोग्राफर. सध्या मात्र काळ एकदमच बदलला असून, लग्न हा एक फोटोग्राफ्री इव्हेंट, तर वेडिंग फोटोग्राफी हे करिअरचे एक क्षेत्र झाले आहे. या क्षेत्रातील देशातील वार्षिक उलाढालीने हजारो कोटी रुपयांची मजल मारली आहे. त्यामुळे अलीकडे लग्नात फोटोग्राफरला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे.
लग्नसोहळा हा आयुष्यातील एक संस्कार असला तरी, फोटोग्राफी हा एक इव्हेंट बनला आहे आणि सध्या अंबानी कुटुंबातील लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत उद्या, शुक्रवार, १२ जुलै रोजी राधिका मर्चंटबरोबर सात फेरे घेणार आहे. या लग्नाआधी अनेक कार्यक्रम झाले असून त्याचे काही खास क्षण आपल्या सर्वांसमोर आले आहेत आणि हे खास सर्वांसमोर आणणारा फोटोग्राफर म्हणजे राधिक जोसेफ.
राधिक जोसेफ हे सेलिब्रिटींच्या लग्नात फोटो काढण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी कतरिना कैफ-विकी कौशल, विराट कोहली-अनुष्का शर्मा, सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी, केएल राहुल-अथिया शेट्टी आणि अशा बऱ्याच बड्या सेलिब्रिटींच्या लग्नात फोटोग्राफी केली आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या मुख्य फोटोग्राफीसाठी होते. मात्र फोटोग्राफर होणे हे त्यांचे स्वप्न कधीच नव्हतं.
फोटोग्राफर म्हणून करिअर सुरु करण्यापूर्वी जोसेफ राधिक यांनी सहा वर्षे अभियांत्रिकी आणि त्यानंतर मॅनेजमेंटचा अभ्यास केला. मग त्यांनी गावोगावी टूथपेस्टहे विकली. मग कॉर्पोरेटमध्ये त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. पण मग आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी उच्च पगाराची नोकरी सोडली. २०१०मध्ये त्यांनी नोकरीला रामराम केला आणि ते पूर्णवेळ वेडिंग फोटोग्राफर बनले. अनेक दिग्गज कलाकारांच्या लग्नात फोटो काढण्याचे ते दिवसाचे जवळपास दीड लाख रुपये घेतात.