मुकेश अंबानी व नीता अंबानी त्यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या लग्नात कोणतीही कसर सोडत नाही आहेत. अनंत अंबानी १२ जुलैला राधिका मर्चंटसह लग्नगाठ बांधणार आहे. या शाही विवाहसोहळ्याचे कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार असून १४ जुलै रोजी संपणार आहेत. अशातच लग्नाच्या काही दिवसांपूर्वीपासून लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. नुकताच राधिका व अनंत यांचा संगीत व हळदी समारंभ दणक्यात पार पडला. ज्यामध्ये कुटुंबियांव्यतिरिक्त अनेक सिनेतारकांनीही सहभाग घेतला होता. मुकेश अंबानी यांनी अनंत व राधिकाच्या लग्नाची खास तयारी केली असून परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी खास खासगी जेटही तयार करण्यात आले आहे. (Anant Ambani And Radhika Merchant Wedding)
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, देश व जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. एवढेच नाही तर परदेशातूनही अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सांभाळणार आहेत. मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब झेड प्लस सुरक्षेत असेल. आयएसओएस (इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑपरेटिंग सिस्टीम) सेटअपदेखील स्थापित करण्यात आला आहे. बीकेसीमध्ये १० एनएसजी कमांडो आणि पोलीस अधिकारी, २०० आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षक, ३०० सुरक्षा सदस्य आणि १०० हून अधिक वाहतूक आणि मुंबई पोलीस कर्मचारी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलही तैनात असेल. त्याचवेळी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी फाल्कन-२००० सह १०० खासगी विमाने सज्ज आहेत.
अनंत व राधिका फ्लॅशमॉबसह लग्नात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या देखरेखीखाली ६० डान्सर्सबरोबर ते परफॉर्म करणार आहेत. त्याचवेळी, ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या ‘स्वदेश’च्या कारागिरांच्या सहकार्याने मनीष मल्होत्रा यांनी लग्नाचे सर्व पोशाख डिझाइन केले आहेत. राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या मेन्यूबद्दल सांगायचे तर, यात हजाराहून अधिक पदार्थांचा समावेश असेल. असे सांगितले जात आहे की, १० हून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ हे पदार्थ तयार करतील.
एवढेच नाही तर व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास रिटर्न गिफ्ट् तयार करण्यात आल्या असून ही घड्याळे करोडो रुपयांची आहेत. या परतीच्या भेटवस्तू अनेक राज्यांतून बनवून आणल्या आहेत. घड्याळे फक्त व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी असतील आणि राजकोट, काश्मीर व बनारसमधील उर्वरित पाहुण्यांसाठी रिटर्न गिफ्ट् तयार करण्यात आल्या आहेत.