Dharmaveer 2 : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर गारुड घातले. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही तूफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्याच्या दुसऱ्या भागाची चाहूल प्रेक्षकांना देण्यात आली होती. तेव्हापासून अनेक चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘धर्मवीर-२’ही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘धर्मवीर-२’ बरोबरचा ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानचा ‘देवरा’ चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये थेट टक्कर झाली होती. त्यात बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धर्मवीर ‘देवरा’वर भारी पडला आहे. (Dharmaveer 2 First Day Collection)
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर-२’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे आणि या पोस्टरमध्ये ‘धर्मवीर-२’ ने पहिल्या दिवशी १.९२ कोटी रुपये कमावले असून हा चित्रपट २०२४ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट आहे . असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे.
तसंच या पोस्टरबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये “पहिल्याच दिवशी नेट १.९२ कोटी कमवून ‘धर्मवीर-२’ चित्रपट ठरला या वर्षीचा सगळ्यांत जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट. संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!” असं म्हटलं आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघेंचं जीवनचरित्र दाखवलं होतं. त्यानंतर आता ‘धर्मवीर-२’ मध्ये त्यांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट दाखवली गेली आहे. ‘धर्मवीर-२’ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला.
दरम्यान, ‘धर्मवीर-२’ या चित्रपटाची निर्मिती ‘झी स्टुडिओज’ आणि ‘साहील मोशन आर्ट्स’ या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तसंच कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. तर कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी चित्रपटाचे काम पाहिले आहे.