मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. अमृताच्या नृत्यकौशल्यावर लाखो प्रेक्षक फिदा आहेत. पण त्याचबरोबरीने तिने रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अमृताने आजवर कलाक्षेत्रात काम करत असताना काही कलाकारांशी घट्ट मैत्री केली. पण सई ताम्हणकर आणि तिचं कधीच जमलं नाही. याबाबत तिने आता भाष्य केलं आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अमृता हजेरी लावणार आहे. या भागाचे काही प्रोमो समोर आले आहेत. या कार्यक्रमात ती प्रत्येक प्रश्नांची बेधडक उत्तरं देताना दिसेल. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते अमृताला सईचा फोटो दाखवतो. हा फोटो पाहिल्यानंतर अमृता तिच्याबाबत व्यक्त होताना दिसते. तसेच दोघींमध्ये मैत्री का होऊ शकली नाही? हे ती सांगत आहे.
आणखी वाचा – रवींद्र महाजनींच्या मृत्यूमागचं खरं कारण काय?, गश्मीर महाजनीने सांगितलं सत्य, म्हणाला, “त्यांचा मृत्यू…”
अमृता म्हणाली, “मुळात म्हणजे मला ती अभिनेत्री म्हणून खूप आवडते. असं अनेकदा झालं आहे की, मी तिची मैत्रीण होण्याचा खूप प्रयत्न केला आहे. पण तिच्याकडून मला तो प्रतिसाद मिळाला नाही”. यावर “भांडण वगैरे काही झालं होतं का?” असं अवधूत अमृताला विचारतो. यावेळी अमृता म्हणते, “नाही नाही अगदीच नाही. आपण एका इंडस्ट्रीमध्ये आहोत म्हणून नेहमीच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतो असं नाही”.
अमृताने सईबरोबर असलेल्या नात्याबाबत पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. सई व अमृतामध्ये कोणत्याच प्रकारचं भांडण झालं नाही. पण दोघींमध्ये कधीच मैत्री झाली नाही. पण सुरुवातीच्या काळामध्ये अमृता व सई एकमेकींच्या मैत्रीण होत्या असं बोललं जातं. आजही एखाद्या कार्यक्रमात दोघीही भेटल्या की त्यांचं बोलणं होतं. मात्र मैत्रीसारखं घट्ट नातं दोघींमध्ये कधीच पाहायला मिळालं नाही.