अयोध्येतील राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा २२ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या प्रतिष्ठापना सोहळ्याला कलाकार मंडळी तसेच नेते मंडळी व इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळीही हजेरी लावणार असल्याचं समोर आलं आहे. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. याच दरम्यान, बिग बींनी अयोध्येत एक भूखंड (प्लॉट) खरेदी केला आहे. ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्या माध्यमातून त्यांनी हा भूखंड घेतला असल्याचं समोर आलं आहे. (Amitabh Bachchan)
अमिताभ बच्चन यांनी घेतलेला हा भूखंड ‘सेव्हन स्टार मल्टीपर्पज एन्क्लेव्ह – द सरयू’ येथे आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, सूत्रांनी या भूखंडाची किंमत १४.५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्याचा आकार १० हजार स्क्वेअर फूट आहे. २२ जानेवारी रोजी ५१ एकरात पसरलेल्या सरयूचे उद्घाटन होणार आहे, त्याच दिवशी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळादेखील होणार आहे. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचा उद्घाटन सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, या प्रकल्पातील आपल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, “माझ्या हृदयात अयोध्या शहरासाठी विशेष स्थान आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्यासह ‘द सरयू’मध्ये घर बांधण्यासाठी मी उत्सुक आहे. अयोध्येतील अध्यात्म व सांस्कृतिक समृद्धीने भौगोलिक सीमा ओलांडून एक भावनिक बंध निर्माण केला आहे. अयोध्येत परंपरा व आधुनिकता दोन्ही आहे. मी या जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बांधण्यास उत्सुक आहे” असं त्यांनी म्हटलं आहे.
HoABL चे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की, “बिग बी हे सरयूचे ‘प्रथम नागरिक’ आहेत. राम मंदिरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आणि अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर सरयू येथे अमिताभजींचा भूखंड आहे. अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या भूखंडात सुरु होणाऱ्या प्रकल्पाचे काम मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे” असंही ते म्हणाले आहेत.