गेले काही दिवस सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि हा चित्रपट म्हणजे ‘लाईक आणि सबस्क्राईब’. खरंतर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. त्यानंतर आलेल्या टीझर व ट्रेलरने ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली होती. अशातच नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अनेक मान्यवर मंडळींकडून चित्रपटाचे कौतुक होत आहे. तर इतकी चर्चा असणारा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ नक्की आहे तरी कसा? चला जाणून घेऊ… (Like Aani Subscribe Review)
सोशल मीडियाचा सतत वापर करणाऱ्या खुशीच्या (जुई भागवत) व्लॉगिंगने या चित्रपटाची सुरुवात होते. मुंबईच्या जुहू बीचवरुन खुशी आपल्या फॉलोअर्सना सूर्यास्त दाखवत असते. पण तिच्या कॅमेऱ्यासमोर तिला एक पिशवी सापडते. ती पिशवी बाजूला करताना जुईला त्यात काही पैसे आणि रोहित चौहान (अमेय वाघ) या नावाचे ओळखपत्र सापडते. मग ती या रोहित चौहानच्या शोध सुरु करते. पुढे खुशी तिला मिळालेल्या ओळखपत्रावरील पत्त्यावर पोहोचते तर तिथे तिला एक मृतदेह सापडते आणि या संपूर्ण प्रकरणात खुशी अडकते. मग पुढे पोलिस आणि त्यांच्या चौकशा सुरु होतात. या सगळ्यात त्यांना दीपिका (अमृता खानविलकर) मदत करते. त्यांच्यासाठी वेळोवेळी धावून येते.
एकीकडे खुशीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी दीपिका व खुशीची मैत्रीण, श्रुती (राजसी भावे) मदत करत असतात. तर दुसरीकडे रोहिदास चव्हाण (अमेय वाघ) त्याच्या गावातून वीस लाख घेऊन फरार होतो. त्यामुळे त्याच्या मागावर फैझल (विठ्ठल काळे) देखील येतो. गावातून पैसे घेऊन पळून आलेला रोहिदास मुंबईत येऊन रोहित बनतो. आता त्याच्या या रोहित बनण्याची नेमकी कहाणी काय? खुशीच्या व्लॉगमधील मृतदेह नक्की कुणाचा आहे? हा नक्की खूनच आहे का? की आणखी काही? आणि जर खून असेल तर नक्की खुनी कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा चित्रपट म्हणजे ‘लाईक आणि सबस्क्राईब’.
आणखी वाचा – “लग्नाची सगळी तयारी झालीय पण…”, प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…
कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर अमेय वाघने त्याच्या रोहिदास व रोहित या व्यक्तिरेखा सहजतेनं रंगवल्या आहेत. अमृता खानविलकरनेही दीपिका या पात्राला योग्य न्याय दिला आहे. तर जुई भागवतनेही पदार्पणात चांगली कामगिरी केली आहे आणि यात त्यांना इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. अभिषेक मेरूकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून सोशल मीडिया आणि त्याचा वापराने होणाऱ्या गैरफायद्यांचं वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी चित्रपटातून उत्तमपणे साधला आहे आहे.
दरम्यान, रहस्यमय कथेवर आधारित असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत खुन्याविषयीची उत्कंठा कायम ठेवण्यात यशस्वी ठरतो. सुरुवातीला चित्रपट काहीसा लांबला असल्याचे जाणवते. पण मध्यंतरानंतर चित्रपट आपला वेग पकडतो. बाकी गौतमी पाटीलचं आयटम सॉंग, कलाकारांचा सशक्त अभिनय आणि आपल्या रोजच्या सोशल मीडियाच्या जगातले हटके व वेगळे कथानक प्रेक्षक म्हणून लक्ष वेधून घेते. त्यामुळे मराठी भाषेत सस्पेन्स मर्डर मिस्ट्री अनुभवायची असेल तर ‘लाईक आणि सबस्क्राईब’ तुमचे नक्कीच मनोरंजन करेल.
