कलाक्षेत्रामधील चंदेरी दुनियेचं अनेकांना आकर्षण असतं. या क्षेत्रात आपलं नशिब आजमवणाऱ्यांचा स्ट्रगल तर काही वेगळाच. इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर, छान ओळख असेल तर ठिक नाहीतर सगळं अवघडच होऊन बसतं. कष्टाला पर्याय नाहीच पण मेहनत करतानाही ती कधी फळाला येणार तोपर्यंतचा प्रवास कठीणच. कित्येक कलाकार या क्षेत्राविषयी, त्यांच्या स्ट्रगलबाबत बोलताना इंडस्ट्रीचं काळं, कटू सत्य समोर आणतात. या जगमगत्या दुनियेची भयावह परिस्थिती धक्कादायक व विचार करायला लावणारी आहे. आता सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनीही इंडस्ट्रीची काळू बाजू समोर आणली आहे. इतके हिट चित्रपट देऊनही त्यांना बाजूला केलं गेलं हे नवलंच. (Ganesh Acharya on Bollywood industry)
बॉलिवूडचं काळं सत्य
भारती सिंह व हर्ष लिंबाचियाच्या युट्यूब चॅनलवरील शोमध्ये गणेश यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. “साऊथमध्ये तुम्ही गाणी करता तेव्हा काम करताना किती मजा येते?” असा प्रश्न भारतीने गणेश यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, “खूप मजा येते. सेटवर काम करणाऱ्या तंत्रज्ञानांना एक वेगळ्याच प्रकारचा आदर मिळतो. मी ‘पुष्पा २’ची गाणी केली. पाच ते सहा दिवस अल्लू अर्जुनबरोबर काम केलं. त्याने स्वतः मला फोन करुन माझं कौतुक केलं. तुमच्यामुळेच सगळं शक्य झालं असंही तो म्हणाला”.
आणखी वाचा – बाईच बाईला जिवंतपणे मारते हे ‘तू’ सिद्ध केलंस…
पुढे गणेश म्हणाले, “आजवर बॉलिवूडमधील एकाही कलाकाराने फोन करुन माझं कौतुक केलं नाही. पण अर्जुनने ते केलं. तुमच्यामुळे लोक माझं कौतुक करत आहेत असं अर्जुन मला म्हणाला. ‘पुष्पा २’च्या सक्सेस पार्टीलाही मला बोलावलं होतं. हैद्राबादमध्ये ही पार्टी होती. मला असं वाटलं होतं की, त्या पार्टीमध्ये लोक येणार, खाणार-पिणार, मजा-मस्ती होणार. पण तिथे चित्र वेगळंच होतं. त्या पार्टीमध्ये मोठा स्टेज होता. लाइटमॅन, स्पॉटबॉय आणि मोठी माणसं होती. अल्लु अर्जून, मी व सुकुमार यांनी मिळून एका एका लाइटमॅनला पुरस्कार दिला. हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. बॉलिवूडमध्ये असं का होत नाही?”.
इंडस्ट्रीमध्ये असणारी घाणेरडी माणसं
गणेश यांनी बॉलिवूडची पोलखोल केली. ते म्हणाले, “जिथे आपण शिकलो त्या इंडस्ट्रीला आपण देवता मानतो. पण काही कारणांमुळे इंडस्ट्रीचं नावंही बदनाम होत आहे. संपूर्ण इंडस्ट्रीच घाणेरडी असं मी बोलणार नाही. पण काही लोक आहेत ज्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. कित्येक दिग्दर्शक-निर्मात्यांना मी एरव्ही मोठेपणा करताना पाहिलं आहे. पण काही कलाकारांच्या समोर शांत होतात. दिग्दर्शक कलाकाराला खूश करण्यासाठी ऐनमोक्यावर कोरियोग्राफीच बदलतात. पण त्याला प्रत्येक गाण्यामागची कोरियोग्राफरची मेहनत दिसत नाही”. गणेश यांचा हा अनुभव खरंच धक्कादायक आहे.