अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाचं रिसेप्शनही अगदी धुमधडाक्यात साजरं करण्यात आलं. या रिसेप्शन सोहळ्यात एका कलाकाराच्या उपस्थितीची सर्वाधिक चर्चा रंगली. ती म्हणजे अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांची. १२ जुलै रोजी मुकेश अंबानी-नीता अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात अभिनेता उपस्थित राहणार होता. मात्र करोना पॉझिटिव्ह असल्याने तो उपस्थित राहू शकला नाही. मात्र, १५ जुलैला झालेल्या शेवटच्या कार्यक्रमात अभिनेता बायकोसह कार्यक्रमाला पोहोचला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या लवकर बरे होण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या दोन कार्यक्रमानंतर १२ जुलैला अगदी शाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी झालेल्या आशीर्वाद सोहळ्याला अनेक राजकारणी व अभिनेत्यांशिवाय हॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली. मात्र अक्षय कुमार यावेळी कुठेही दिसत नव्हता. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य मंगल उत्सवात सहभागी झाला नाही.
यानंतर १५ जुलै रोजी झालेल्या शेवटच्या सोहळ्यात अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांना पाहून चाहत्यांना आनंद झाला. ‘कोविड-19 पॉझिटिव्ह’ असल्याने तो या कार्यक्रमांपासून दूर होता. ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानत्याला अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्याच्या चाचण्या करण्यात आल्या आणि त्याला संसर्ग झाल्याचे कळले. एवढेच नाही तर त्याचे काही क्रू मेंबर्सही पॉझिटिव्ह आढळले.
या सर्व प्रकारानंतर पत्नी ट्विंकल खन्नासह एका कार्यक्रमात पाहून सोशल मीडियावर त्याच्या करोनापासून इतक्या लवकर बरे होण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “अरे, करोना इतक्या लवकर बरा झाला का?”. तर एकाने लिहिले आहे की, “कोविड लवकर बरा झाला?”. तर एका चाहत्याने, “त्याला कोरोना झाला होता, ठीक आहे का?”, असं विचारलं आहे. एकाने लिहिले, “दोन दिवसांपूर्वी तो करोना पॉझिटिव्ह होता, आता तो बरा झाला आहे, मग तो इथे का फिरत आहे? तुम्ही सर्वांना संक्रमित कराल”, असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे.