आज महाराष्ट्रात सर्वत्र आषाढी एकादशीचा सण साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक भक्त या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. सर्वत्र पंढरीमय वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे. या पंढरीच्या भक्तीत कलाकार मंडळीही तल्लीन झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरुन विठुरायाच्या भक्तीचे अनेक अनुभवही शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. अशातच आता एका कलाकाराने विठुरायाच्या भक्तीचा एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे, हा कलाकार म्हणजे अभिनेता अक्षय केळकर. अक्षय या विठुरायाचा खूप मोठा भक्त आहे. (Akshay Kelkar Video)
काही दिवसांपूर्वी अक्षयने मुंबईत स्वत:चं घर घेतलं. घर घेतल्यापासून ते गृहप्रवेशापर्यंत सगळे खास क्षण त्याने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ शेअर करत घराची झलक दाखवली. यावेळी त्याच्या घरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये घरातील विठ्ठलाच्या मूर्तीला तो पीतांबर व डोक्यावर शेला बांधताना दिसत आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या सजावटीसाठी त्याने आईच्या साड्यांचा वापर केला आहे.
यानंतर आता आषाढी एकादशीचे औचित्य साधत अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या घरातील सुंदर असं पेंटिंग दाखवलं आहे. आणि यांतून त्याची विठूरायाची भक्ती समोर येत आहे. अक्षयने स्वतः चित्र काढत हा खास कोपरा सजवला आहे. त्याने घरात बनवून घेतलेल्या देवळ्यांवर वारकऱ्यांची भक्ती दिसली.
हा व्हिडीओ शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “जेव्हा या देवळ्या बनवल्या तेव्हा सुरुवातीला माहीत नव्हतं मी इथे नेमकं काय ठेवणार आहे. खूप गोष्टींचा विचार केला होता पण इथे दैवी गोष्टचं यायची होती. माझ्या नव्या शेजाऱ्यांकडून माझ्या घरासाठी आलेली ही एक सुंदर भेटवस्तू. मला कलाकार माणूस भेटला. या इतक्या सुंदर वारकऱ्यांच्या प्रतिकृतींसाठी. माझी पंढरी सजली आणि तुमच्यामुळे इतकी सुंदर सजली. विशेष म्हणजे हे सुंदर वारकरी अभिजीत सरांनी स्वतः बनवलेले आहेत. त्यामुळे हा एकमेव सेट आहे आणि तो आता फक्त माझ्याकडेच आहे. विश्वास ठेवा ही श्रीमंतीच वेगळी आहे. माझ्या नवीन घरासाठी सर्वोत्तम भेटवस्तूंपैकी एक”.