मराठी सिनेसृष्टीतील एव्हरीग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर. गेली अनेक वर्ष ही जोडी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच त्यांच्या कामाबरोबर ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच लोकप्रिय आहे. ही जोडी सोशल मीडियावरील अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओला चाहतेदेखील तुफान प्रतिसाद देत असतात.
सोशल मीडियावर या जोडीचे अनेक व्हिडीओ काहींना आवडत असले तरी अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. त्यांच्या आतापर्यंतच्या अनेक व्हिडीओला ट्रोलर्स विविध कमेंट करत त्यांना जोरदार ट्रोल करतात. पण अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या ट्रोलिंगवर नेहमीच सडेतोड उत्तर देताना दिसतात. अशातच ऐश्वर्या यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओद्वारे पुन्हा ट्रोलर्सला सुनावले आहे.
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “मला असं वाटतं की, आम्हाला बरंच ट्रोल केलं जातं. त्यामुळे मी माझ्या युट्यूबवरच्या कमेंट्सही बंद केल्या आहेत. कारण मला असं वाटतं की आवडलं किंवा नाही आवडलं. हेच महत्त्वाचे आहे. अचकट-विचकट कमेंट्सपेक्षा त्या न वाचलेल्या बऱ्या म्हणून मी कमेंट्स बंद केल्या आहेत”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अविनाश यांना नाचायला खूप आवडतं. त्यामुळे आम्ही वेळ मिळेल तसा एखादा व्हिडीओ शूट करतो. पण त्यावर अनेकदा तुमचं वय काय? तुम्ही करताय काय? अशा अनेक कमेंट्स करत ट्रोल केलं जातं. पण मला असं वाटतं की वयाचं भान ठेवून काही उपयोग नाही. आपलं आयुष्य आपल्याला एकदा मिळालं आहे. ते आपल्याला हवं तसं आपण जगलं पाहिजे”. ऐश्वर्या व अविनाश नारकर हे त्यांच्या व्यस्त वेळातून वेळ काढत ट्रीपसाठी गेले आहेत. दोघे जण पाचगणी इथ ट्रीपसाठी गेले असून या ट्रीपचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या सेटवरील धमाल, मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ त्या नेहमीच शेअर करत असतात. मालिकेतील कलाकारांबरोबर त्या नेहमीच हटके आणि ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवत असतात.