‘बिग बॉस १७’ हा रिऍलिटी शो विशेष गाजला. ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांमुळे या शोची उंची वाढली होती. एकापेक्षा एक असलेल्या या स्पर्धकांनी उत्तम खेळी खेळलेली पायाला मिळाली. ‘बिग बॉस १७’ च्या पर्वात सुप्रसिद्ध कॉमेडियन मुन्नवर फारुकीने विजेतेपद पटकावलं. तर अभिषेक कुमार याने उपविजेतेपदावर नांव कोरलं. विजेतेपद पटकवल्यानंतर मुन्नवर फारुकी विशेष चर्चेत आला. अभिनेत्याचं त्याच्या राहत्या परिसरात म्हणजे डोंगरी येथे जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. (Munawar Faruqui New Project)
हा शो जिंकल्यानंतर ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुन्नवर फारुकीकडे मोठे प्रोजेक्ट्स येत असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय मुन्नवर लवकरच आणखीही काही रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, मुन्नवर यांने स्वतःहून त्याच्या कोणत्याही आगामी प्रकल्पांचा खुलासा केलेला नाही. दरम्यान, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर दिसत आहे.
मुन्नवर फारुकी हे रिॲलिटी शोच्या जगातील एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर त्याची आधीपासूनच चांगली फॅन फॉलोइंग होती, ‘बिग बॉस १७’ नंतर ही संख्या झपाट्याने वाढलेली दिसली. मुन्नवरला ‘खतरों के खिलाडी १४’ या रिऍलिटी शोमध्ये पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच, ‘कसौटी जिंदगी की २’ फेम हिना खानबरोबरचे त्याचे काही फोटो कोलकत्ता येथून समोर आले आहेत.
हिना खान व मुन्नवर फारुकी एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी कोलकत्ता येथे गेले आहेत. शूटिंगदरम्यानचे दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी दोघांचा बंगाली लूक पाहायला मिळत आहे. यावेळी हिनाने पारंपरिक बंगाली साडी तर मुन्नवर पांढरी धोती-कुर्त्यात दिसला. दोघेही सेटवर एकमेकांसह मस्ती करताना दिसत आहेत. अभिनेत्री हिना खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर कोलकत्ताचे काही फोटो शेअर केले आहेत. स्थानिक खाद्यपदार्थ व विविध संस्कृतींमधील खाद्यपदार्थांची छायाचित्रेही त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहेत.