मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून या जोडीची ओळख आहे. त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘वेड’ चित्रपटातील जिनिलीयाच्या अभिनयाने तिने साऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. काही काळ सिनेसृष्टीपासून जिनिलियाने ब्रेक घेतला होता, दरम्यान तिने ‘वेड’ चित्रपटातून बऱ्याच कालावधीनंतर पदार्पण केलं. जिनिलीयाने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. (Genelia Deshmukh With Aamir Khan)
अशातच आता जिनिलीया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच जिनिलीया बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर जिनिलीया एका बड्या बॉलिवूड स्टारसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. जिनिलीया लवकरच अभिनेता आमिर खानबरोबर ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात झळकणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
बॉलीवूडमध्ये आशयघन चित्रपटांच्या सादरीकरणासाठी आमिर खान हा नेहमीच ओळखला गेला आहे. त्याच्या यापूर्वीच्या अनेक चित्रपटांतून काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे चाहत्यांना आमिरच्या चित्रपटाची नेहमीच उत्सुकता असते. आता त्याच्या ‘सितारे जमीन पर’ नावाच्या चित्रपटाचे चाहत्यांच लक्ष वाढून घेतलं आहे. विशेषतः या चित्रपटात आमिरसह जिनिलीया देशमुख झळकणार असल्याने साऱ्या प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटासाठी सुपरस्टार रितेश देशमुखची पत्नी बी टाऊन अभिनेत्री जिनिलीया देशमुखचे नाव स्वत: आमिर खानने सुचवले असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी जिनिलीया पात्र ठरेल, असा विश्वास आमिरला वाटत आहे. त्या नंतर आता ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामध्ये जिनिलीया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे, असे म्हणता येईल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत बातमी समोर आलेली नाही. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ‘सितारे जमीन पर’ चित्रपट बनणार असल्याची माहिती आहे.