Vidisha Mhaskar On Mandar Devsthali : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता शशांक केतकर हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. सामाजिक विषय असोत किंवा इंडस्ट्रीतील प्रश्न, शशांक नेहमीच बेधडकपणे आपली भूमिका मांडताना दिसतो. सोशल मीडियावरही तो सक्रिय असून, आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी तो अनेकदा चाहत्यांसोबत शेअर करतो. अशातच नुकतीच शशांक केतकरने एक पोस्ट शेअर करत ‘हे मन बावरे’ या मालिकेच्या निर्मिती संदर्भातील गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये शशांकने निर्माता मंदार देवस्थळी यांच्याकडून पाच वर्षे उलटूनही मानधन मिळालं नसल्याचा आरोप केला आहे. त्याच्याकडून सतत पुढच्या तारखा देण्यात आल्या आणि पैसे देण्याच्या थापा मारण्यात आल्याचंही नमूद केलं.
‘हे मन बावरे’ ही मालिका २०१८ साली प्रदर्शित झाली होती. कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर २०२० मध्ये या मालिकेचा प्रवास संपला. या मालिकेत शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस प्रमुख भूमिकेत दिसले होते. याशिवाय शर्मिष्ठा राऊत, वंदना गुप्ते, विदिशा म्हसकर, विजय पटवर्धन यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते.
आणखी वाचा – “आत्महत्येची भीती दाखवतो…”; शशांक केतकरचे मंदार देवस्थळीवर आरोप, व्हिडीओ शेअर केला अन्…

मात्र, मालिका संपून पाच वर्षे झाली तरी काही कलाकारांना अद्याप मानधन मिळालेलं नाही, असा आरोप आता समोर येत आहे. शशांकच्या या पोस्टनंतर बहुतेक कलाकारांनी कमेंट करत आपल्यासोबतही असाच अनुभव आल्याचं सांगितलं. ज्यामध्ये अभिनेत्री विदिशा म्हसकरने देखील आपली बाजू मांडली आहे. सध्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत काम करणाऱ्या विदिशा म्हसकरने शशांकच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की,”माझेही टीडीएससह जवळपास तीन लाख रुपये बाकी आहेत. त्यावेळी आम्ही बोललो म्हणून आम्हाला ट्रोल केलं गेलं, चुकीचं ठरवलं गेलं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं चालतच असतं. नंतर ती गोष्ट सोडून आम्ही पुढे गेलो.”
आणखी वाचा – ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रीचं ठरलं! लवकरच अडकणार लग्नबंधनात, सुपारी फुटली अन्…
पुढे विदिशाने म्हटलं, “जॉब, बिझनेस आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी कायदे आहेत, पण मनोरंजन सृष्टीसाठी एकही नियम-कायदा नाही. कामाच्या तासांपासून, सुट्टीपर्यंत, पगारांसाठी कशाचेच कायदे नियम नाहीत. मी या विषयासंबंधित खूप वकिलांशी बोलले आहे, पण ते सुद्धा म्हणतात की, काही होऊ शकत नाही. मनोरंजन सगळ्यांना पाहिजे असतं; पण त्यासाठी रोज १४-१४ तास काम करावं लागतं. आम्ही तेही आनंदाने करतो; पण कामाच्या बदल्यात आम्हाला हे मिळतं”, असे म्हणत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. मात्र कामाच्या बदल्यात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल तिने नाराजी व्यक्त केली.





