अभिनेत्री तनुश्री दत्ता व राखी सावंत यांच्यातील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. सध्या सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरु आहे. नुकतंच तनुश्रीने राखी सावंतविरोधात एफआयआर दाखल करत कायदेशीर मार्ग स्विकारला असल्याचा खुलासा स्वतः अनुश्रीने केला आहे. यापूर्वीही तनुश्रीने २००८ व २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. आता तनुश्रीने राखी सावंतविरोधात एफआयआर नोंदवत मोठं वक्तव्य केलं आहे. नुकतीच तनुश्रीने राखी विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली होती. त्यावेळी तिने मीडियासह संवाद साधला. (Tanushree dutta file FIR against rakhi sawant)
तनुश्री म्हणाली, “राखी सावंतने २०१८ मध्ये मला खूप त्रास दिला होता. त्यासाठी मी तिच्या विरोधात एफआयआर दाखल करायला आली आहे. तिच्यामुळेही २०१८ मध्ये ‘मी टू’ प्रकरणादरम्यान मला मानसिक त्रासाला सामोर जावं लागलं होतं. या एफआयआरमध्ये बरीच कलमं लावत तिच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. माझ्या विरोधात जे काही बोलली आहे ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवलं आहे. यावेळी तिला माफ केलं जाणार नाही. लवकरच तिच्यावर कारवाई होईल”.
तनुश्री पुढे सांगते, “हे प्रकरण तेव्हा सुरु झालं जेव्हा ‘हॉर्न ओके प्लिज’ चित्रपटात निर्मात्यांनी राखी काढून मला घेतलं होतं. त्यानंतर माझ्या नाना पाटेकर यांच्याबरोबरच्या वादामुळे राखीला पुन्हा चित्रपटात घेण्यात आलं. हा त्यांचा एक कट होता ज्याचा वापर करून मला चित्रपटातून बाहेर करत त्यांना प्रसिद्धी मिळवायची होती. त्यांनी त्यावेळी माझे सगळे चेक बाउंस केले होते. यासगळ्या कारस्थानात राखीदेखील सहभागी होती. राखीमुळेच मला बऱ्याच भावनिक व मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. तिने माझ्याबाबत खूप चुकीची वक्तव्ये केली आहेत. आता ती मी सहन करु शकत नाही. राखी प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी दरवर्षी कोणता ना कोणता विषय खोदून काढत असतेच. तिनेच माझी पूर्ण प्रतिमा खराब केली आहे. तिने माझ्या वैयक्तिक आयुष्यावर निशाणा साधला आहे. तिच्यामुळेच मी लग्न करु शकले नाही. राखीने खूप काळापर्यंत मला त्रास दिला आहे”.
तनुश्रीला एफआयआर एवढ्या उशीरा का नोंदवला गेला असा प्रश्न केला असता ती म्हणली, “मी २००८ व २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली होती. पण राखीने आपल्या व्हिडिओतून व माझ्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मी खूप खचून गेली. आता जेव्हा मी पुन्हा आले आहे आणि माझ्याकडे वेळ आहे तर मी हे सुनिश्चित करेन की राखीने जे माझ्याबरोबर केलं आहे त्यासाठी तिला चांगलीच शिक्षा मिळेल”. मात्र या प्रकरणाबाबत ओशिवरा पोलीसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही.