‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील साधना या पात्रामुळे अभिनेत्री सुकन्या मोने घराघरात पोहोचल्या. उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना म्हणून आजवर सुकन्या यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. छोट्या पडद्यावरील मालिकांमधून तर सुकन्या यांनी आपली ओळख निर्माण केली. सेटवर एकत्र काम करत असताना सुकन्या यांची एक सवय सर्वांना अधिक आवडते ती म्हणजे त्यांनी आणलेला टिफिन. संपूर्ण सिनेविश्वात सुकन्या ताईंसोबत काम केलेला असा एकही कलाकार नसेल ज्याला सुकन्या ताईंच्या हातची चव माहित नसेल. वेगवेगळे पदार्थ बनवून ते इतरांना खाऊ घालण्यात सुकन्या ताईंचा हातखंडा आहे. मात्र तुम्हाला सुकन्या ताईंचा सुगरण होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासात कोणाचा अधिक वाटा आहे याबद्दल त्यांनी दुसरी बाजू या कार्यक्रमात सांगितलं आहे. काय आहे तो नेमका प्रवास चला जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात.(Sukanya mone shares incident)
सुकन्या ताईंनी याबद्दल बोलताना सांगितलं आहे की, लग्नाआधी मला साधा चहा सुद्धा बनवायला नाही यायचा. जे काही मी जेवण बनवायला शिकलेय ते सगळं सासरी आल्यानंतर. माहेरी असताना मी लहान असल्याने माझे बरेच लाड होत होते. आई कामाला सुरुवात करण्याआधी सगळं जेवण करून बसायची. नंतर माझ्या मोठ्या बहिणीला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडायचे त्यामुळे तीच करायची, दादाच लग्न झाल्यावर वहिनीला जेवण करायची आवड होती त्यामुळे माझ्यावर कधी जेवण बनवायची वेळच आली नाही. बरेचदा मी पाणी प्यायलेले ग्लास सुद्धा उचलायचे नाही इतकं होत. त्यानंतर लग्न करून सासरी आल्यानंतर मी सासूबाईंना सांगितलं की माझी जेवण बनवायची पाटी ही कोरी आहे पण जर तुम्ही मला शिकवलंत तर शिकण्याची माझी तयारी आहे.
पाहा कशा झाल्या सुकन्या मोने सुगरण (Sukanya mone shares incident)
नंतर आम्ही दोघंही कामात इतके व्यस्त झालो की माझ्या सासूबाई एकट्या राहावं लागतंय म्हणून नंदेकडे गेल्या, त्यानंतर ही जबाबदारी माझ्या वर येऊन पडली. त्यावेळी मला संजयने फार मदत केली. हा एक आवर्जून सांगेन की, मी जेव्हापासून जेवण करायला लागले तेव्हापासून त्यांनी माझ्या जेवणाला कधीही नाव ठेवलेलं नाही. शूटिंगला जाताना सुरुवातीला आम्ही सूप आणि भाज्या घातलेले पराठे न्यायचो. संजय कणिक मळून ठेवायचा, आणि सूप गाळल्यानंतर भाज्या उरायच्या त्याचे आम्ही पराठे करायचो. सुरुवातीला सेटवर हाच नाश्ता होता. पोळ्या लाटताना नकाशे येऊ लागले, तेव्हा संजय म्हणायचा येउदे की नकाशे, कुठेतरी फिरून आल्यासारखं तरी वाटेल.
हे देखील वाचा – ‘९० लाखांचं कर्ज काढून हा सिनेमा केला’ केदार शिंदेंनी सांगितला संघर्षाचा किस्सा
हळू हळू संजयने मला सर्व शिकवलं, त्यानंतर ज्युलिया झाली, आपली आई हा पदार्थ छान करते असं माझ्या लेकीला अभिमानाने सांगता यावं म्हणून मी रेसिपी बुक मधून वा सासू बाईंनी लिहून ठेवलेल्या त्यांच्या डायरीतल्या रेसिपी पाहून जेवण बनवू लागले. मी स्वयंपाक मनापासून करते आणि मला तो मनापासून इतरांना खाऊ घालायची इच्छा असते म्हणून कदाचित मी प्रेमाने तो बनवलेला पदार्थ चविष्ट होतो. मी उत्तम स्वयंपाक करते यांत संजय आणि ज्युलियाचा मुख्य वाटा आहे.