Rinku Rajguru Photo With Krishnaraaj Mahadik : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट ‘सैराट’ चित्रपटातून नावारूपास आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूची क्रेझ आजही कायम आहे. सैराटनंतर रिंकू काही चित्रपटांमध्ये झळकली असली, तरी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून इन्स्टाग्रामद्वारे ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे फोटोज व व्हिडीओ तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच रिंकू पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ही चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे रंगली आहे. कारण अभिनेत्रीने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले मात्र यावेळी तिच्याबरोबर खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिकही दिसला. त्यामुळे या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
कृष्णराजच्या कार्यालयाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिराबाहेर दोघांचा फोटो आहे. “अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले”, असं कॅप्शन देत कृष्णराज व रिंकू यांचा दर्शनांनंतरचा फोटो समोर आला आहे. दोघांचा एकत्रित हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केलेल्या पाहायला मिळत आहेत. ‘झालं झिंग झिंग झिंगाट…’, ‘साहेबांना नाहीतर आईना पाठवा हा फोटो जरा कोणी तरी’, ‘थोड्या वेळासाठी वाटलं तुमचं लग्नच ठरलं की काय’, ‘वहिनी आहे काय’ अशा कमेंट करत सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे.
कृष्णराज महाडिक हा कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा आहे. तर महादेवराव महाडिक उर्फ अप्पा यांचा चुलत नातू. कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक कुटुंबाचे नाव मोठे आहे. महादेव महाडिक यांचे सुपुत्र अमल महाडिक, तर पुतणे धनंजय महाडिक. धनंजय महाडिक सध्या भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेवर खासदार आहेत. याआधी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादियाचं ‘ते’ आक्षेपार्ह विधान कोणतं?, शेवटी मागावी लागली माफी, प्रकरण तापलं
कृष्णराज महाडिक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो, त्याचं स्वतःचं यूट्युब चॅनलही आहे. या चॅनलवर तो महाडिक कुटुंबातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्यामुळे कृष्णराज महाडिकला महाराष्ट्राबाहेरही ओळख मिळाली आहे.