Rhea Chakraborty Sushant Singh Rajput : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण अजूनही प्रत्येकाच्या लक्षात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीमधील काही प्रतिष्ठीत व्यक्तींचीही नावं समोर आली होती. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्ती. सुशांतच्या आत्महत्येनंतर रियावर अनेक आरोप करण्यात आले. तिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी तिला अटकही झाली होती. मात्र आता या प्रकरणाने मोठा युटर्न घेतला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टद्वारे रिया निर्दोष असल्याचं समोर आलं आहे.
सुशांतचा मृत्यू ही केवळ आत्महत्या असल्याचं सीबीआय रिपोर्टनुसार समोर आलं आहे. तसेच रियालाही क्लीन चिट देण्यात आली आहे. या निर्णयानंतर रियाला बॉलिवूडमधून पाठिंबा मिळत आहे. दिया मिर्जा, आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी रियाला पाठिंबा दिला आहे. तसेच क्लीन चिट मिळाल्यानंतर रियाने सिद्धीविनायकचं दर्शन घेतलं. रिया व तिच्या कुटुंबियांसाठी हा मोठा दिवस आहे.
आणखी वाचा – कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेलं गाणं नक्की कोणतं?, वाद का पेटला?, असे काही शब्द वापरले की…
रिया चक्रवर्तीला बॉलिवूड कलाकारांचा पाठिंबा
रियाबाबत दिया म्हणाली, “रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांची लिखित स्वरुपात माफी मागण्याची हिंमत आता कोणत्या मीडियाकडे आहे का? तुम्ही तिची शिकार करायला गेलात. निव्वळ टीआरपीसाठी तुम्ही तिचा मानसिक छळ केला. प्रचंड त्रास दिला. तुम्ही यासाठी माफी मागूच शकता”. दियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आलिया भट्टची आई सोनी राजदान म्हणाल्या की, “बिचाऱ्या मुलीला जेलमध्ये पाठवण्यापूर्वी, तिची बदनामी करण्यापूर्वी तुम्ही हा निर्णय देणं गरजेचं होतं. हे दुसरं तिसरं काही नसून मॉर्डन जगातील जादू-टोणा आहे. संपूर्ण देशाने रिया चक्रवर्तीची माफी मागितली पाहिजे”. सुशांतला आत्महत्येसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप रियावर होता. शिवाय तिने सुशांतच्या बँक खात्यातील १५ कोटी रुपये लंपास केल्याचेही आरोप होते. १४ जून २०२०मध्ये सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. तब्बल चार वर्षांनंतर या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळालं आहे.