मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका फेम अभिनेता अभिषेक गांवकर सोशल मीडिया स्टार सोनाली गुरवबरोबर विवाह बंधनात अडकला. अशातच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. अशातच अभिनेत्रीने नुकतंच तिच्या हाताला मेहंदी लागल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘माझी मेहंदी’ असं कॅप्शन देत रेश्माने तिच्या हातावरील मेहंदीचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Reshma Shinde Mehndi Ceremony)
रेश्माच्या हातावरच्या मेहंदीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साता जन्माची साथ, सनई-चौघडे, नवीन वर आणि वधूची डिझाइन असलेली मेहंदी रेश्माच्या हातावर पाहायला मिळत आहे. तसंच तिने नवऱ्याच्या हाताला आपला हात जोडत त्यावर इंग्रजी मध्ये US (आम्ही) असंही लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. या मेहंदी सोहळ्याबरोबरच तिच्या लग्नाआधीच्या काही पारंपरिक विधींनादेखील सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने विठ्ठल-रूक्मिणीच्या मूर्तीबरोबरही फोटो शेअर केला आहे. तसंच घरातील काही स्त्रिया पारंपरिक विधी करतानाचेही फोटो तिने शेअर केले आहेत.
आणखी वाचा – “तर आता गुंड किंवा चोर असतो”, अनंत जोग यांचा स्वत:विषयी धक्कादायक खुलासा, म्हणाले, “माझ्या हातून खून…”
रेश्माने मेहंदी सोहळ्याला पारंपरिक लूक केला होता. गळ्यात छानसा नेकलेस, मोकळे केस, ट्रेडिशनल मेहंदी रंगाचा ड्रेस या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या मेहंदी सोहळ्याच्या फोटोला चाहते व कलाकार मंडळींकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने अजून तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलची काहीही माहिती शेअर केलेली नाही, त्यामुळे तिचा होणारा नवरा नक्की कोण आहे? याबद्दलची उत्सुकताही चाहत्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे.
रेश्माच्या घरात सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. केळवणाचे फोटो व्हायरल झाल्यावर अभिनेत्रीचा होणार नवरा कोण आहे?, ती नेमकी केव्हा विवाहबंधनात अडकणार? या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. त्यामुळे आता रेश्माची अनेक चाहते मंडळी अभिनेत्रीच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे