अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या एका फेक व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रश्मिका मंदानाचा फेक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला असून हा तिचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाहून यावर अमिताभ बच्चन यांनीही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय अनेक चाहत्यांनीही हा व्हिडीओ पाहून कारवाईची मागणी केली. या व्हिडीओमध्ये खऱ्या आणि खोट्यातील फरक कळत नाही आहे, त्यामुळे व्हिडीओ पाहताक्षणी हा व्हिडीओ रश्मिकाचा आहे असंच वाटतंय. (Rashmika Mandanna On Viral Video)
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय घट्ट व बोल्ड कपडे परिधान केले आहेत. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
रश्मिकाने या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, “माझा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालं आहे. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत.”

पुढे रश्मिकाने लिहिलं आहे की, “पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही. इतर अनेकजण अशा प्रकरणाला बळी पडण्यापूर्वी आपण याचा एक समाज म्हणून निषेध करायला पाहिजे.” असं म्हणत तिने संताप दर्शविला आहे.