Prarthana Behere Father Died : मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रार्थनाच्या वडिलांचं अपघाती निधन झालं असून, या घटनेनं संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रस्ते अपघातात तिच्या वडिलांचं निधन झालं. या दुःखद घटनेची माहिती स्वतः प्रार्थनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टद्वारे दिली. तिने तिच्या बाबांचा फोटो पोस्ट करत भावुक कॅप्शन दिलं. प्रार्थनाने आजवर तिच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलं. नेहमीच ती तिच्या ग्लॅमरस अंदाजाने साऱ्यांच्या पसंतीस उतरली. अशातच आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्रार्थनाच्या वडिलांचे कार अपघातात निधन झाले आहे.
वडिलांना जाऊन बारा दिवस झाल्यानंतर तिने ही दुःखद गोष्ट पोस्ट शेअर करत सांगितली. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “बाबा… तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय, तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतंय, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो. तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं. तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे”.
पुढे तिने म्हटलं, “आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात. तुमची अचानक झालेली एक्झिट, मनाला भयंकर लागली आहे. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच राहणार आहे. कारण तुम्ही स्मरणात राहणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय. तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत राहणं, हे माझं कर्तव्य आहे. डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. काळजी करु नका… मी खुप स्ट्रॉंग आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे”.
आणखी वाचा – सतीश शाह यांच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, ऑनस्क्रीन लेकाने दिला खांदा, तर सून पार्थिवासमोर ढसाढसा रडली
काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाची जिवलग मैत्रीण, अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं, आणि आता वडिलांच्या जाण्यानं प्रार्थनावर दु:खाचा दुहेरी आघात झाला आहे. तिच्या या भावनिक पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकारांनी तिच्या दुःखात सहभागी होत तिला धीर दिला आहे.





