हिंदीसह मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण, आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. तसेच मालिकेचा प्रोमोही शेअर करण्यात आला होता. या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी अशोक सराफ हे मालिकांमध्ये कमबॅक करणार आहेत. (Ashok Saraf Injured)
२५ नोव्हेंबर पासून अशोक सराफांची ‘अशोक मा. मा.’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेवेळी अशोक सराफांना मोठी दुखापत झाली होती. तरीही अशोक सराफांनी मालिकेचे शूटिंग केले. याबद्दल त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या पहिल्या भागानिमित्त अशोक सराफ व निवेदिता सराफांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी दुखापत असतानाही शुटींग केल्याच्या प्रसंगाबद्दल सांगितले. या पत्राकार परिषदेत अशोक सराफांना त्यांच्या या वयातही काम करण्याच्या एनर्जीविषयी विचारण्यात आले.
याचे उत्तर देत अशोक सराफांनी असं म्हटलं की, “माझ्या या वयात काम करण्याची एनर्जी म्हणजे सगळे प्रेक्षक आहेत. मी केलेलं प्रत्येक तुम्हाला आवडतं आणि तुम्ही त्या कामाचं कौतुक करता. हीच माझ्यासाठी काम करण्याची एक एनर्जी आहे. हा एक चमत्कार आहे”. यापुढे निवेदिता यांनी असं म्हटलं की, “अशोक सराफ हा एक वेडा नट आहे. काम करत असले की त्यांना वेगळं काही सुचत नाही. काही दुखत असलं तरी अभिनय सुरू केला की त्यांना बरं वाटू लागतं. पूर्वी परिकथेत ऐकायचो की एखाद्या राजाचा जीव त्याच्या पोपटात किंवा अंगठीत आहे. तसं अशोक सराफांचा जीव अभिनय आणि प्रेक्षकांमध्ये आहे”.
आणखी वाचा – गुलाबाची कळी हळदीने माखली! शोभिता धुलिपालाला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, फोटो व्हायरल
यापुढे अशोक सराफांनी असं सांगितलं की, “या मालिकेचं शुटींग करत होतो तेव्हा बरगडीला फ्रॅक्चर झालं होतं. पडल्यामुळे एका बरगडीला फ्रॅक्चर आणि दोन बरगड्यांना क्रॅक गेला होता. तरीसुद्धा त्यांनी या मालिकेचे शुटींग पूर्ण केलं. शुटींग करताना मला काही कळलंच नाही. पण नंतर दुखायचं. दरम्यान बऱ्याच वर्षांनी अशोक सराफ यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही बरेच उत्सुक आहेत. २५ नोव्हेंबरपासून दररोज रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.