actor namitha allegation : तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना प्रसिद्ध श्री मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आला असल्याचा प्रसंग सध्या चर्चेत आला आहे. अभिनेत्रीला हिंदू असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले गेले. मंदिर अधिकाऱ्यांच्या कथित असभ्य वर्तनाबद्दल अभिनेत्रीने निराशा व्यक्त केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभिनेत्री नमिता यांनी सोमवारी असा आरोप केला की मंदिराच्या अधिकाऱ्याने तिला दर्शन घेण्यापासून रोखले आणि हिंदू असल्याचा पुरावा मागितला. मी हिंदू असल्याचे सिद्ध करण्यासाठी अधिकाऱ्याने माझ्याकडे प्रमाणपत्र मागितले आणि माझे जात प्रमाणपत्रही मागितले.
मी देशातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या आहेत पण त्यात मला अशा छळाचा सामना कदापि करावा लागला नाही. अभिनेत्रीने या प्रकरणावरुन भाष्य करत सांगितले की, “माझा जन्म हिंदू कुटुंबात झाला आणि माझे लग्न तिरुपती येथे झाले. माझ्या मुलाचे नाव भगवान कृष्णाच्या नावावर आहे हे सर्वज्ञात सत्य आहे. एक अधिकारी माझ्याशी उद्धटपणे बोलला. माझी जात आणि माझी श्रद्धा सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्रांची मागणी केली”.
यावर मंदिराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोप फेटाळले आणि सांगितले की, त्यांनी नमिता आणि तिच्या पतीला थांबवले, ज्यांनी निकाब घातले होते आणि ते हिंदू आहेत का असे विचारले आणि त्यांना मंदिराच्या परंपरेबद्दल सांगितले. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर त्यांच्या कपाळावर कुंकुम लावून त्यांना मीनाक्षी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेण्यात आले. याविषयी अभिनेत्रीला विचारले असता तिने सांगितले की, “तिचा विश्वास स्पष्ट केल्यानंतर आणि कपाळावर कुंकुम लावल्यानंतरच तिला दर्शनाची परवानगी देण्यात आली. माझी मदुराईची भेट अध्यात्मिक होती आणि मी इस्कॉन येथे कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी आले होते”, असे तिने सांगितले.
अभिनेत्री म्हणाली की, “प्रत्येक गोष्ट विचारायची पद्धत आहे. मला २० मिनिटे एका कोपऱ्यात थांबावे लागले. रविवारी आमच्या भेटीची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती. तसेच आमच्या येण्यामुळे इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही मास्क परिधान केला होता”. आदल्या दिवशी, नमिताने हिंदू धार्मिक आणि धर्मादाय निधी मंत्री पीके शेखर बाबू यांना एक व्हिडीओरुपी संदेश पाठवत तिची दुर्दशा स्पष्ट केली आणि मंदिराच्या अनियंत्रित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची विनंती केली.