छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच स्वतंत्र व्यवसाय निर्मितीतही आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे. अशा अनेक कलाकारांच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे, ते म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसचं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत नवीन सुरुवात करणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तुम्ही ओळखू शकता का नेमकं काय सुरु आहे?”, असं कॅप्शन देत तिने एका जागेचं इंटिरियर डिझायनिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. (Mrunal Dusanis New Restaurant)
अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं असून ठाण्यात तिने स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. मृणाल-नीरजने रविवारी सर्वांना आनंदाची बातमी दिली. मृणाल आणि नीरज या दोघांनी ठाण्यात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं असून याचं नाव Belly Laughs असं आहे. कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद लोकांना रेस्टॉरंटमध्ये घेता येईल. ठाण्यातील हिरानंदानी भागात मृणालने हे रेस्टॉरंट उघडलं आहे. पहिल्याच दिवशी लाईव्ह संगीत आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत या रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ज्ञानदा रामतीर्थकर, राजश्री निकम, वंदना गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसह अनेकांनी रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला हजेरी लावली.
यावेळी अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. याबद्दल ती असं म्हणाली की, “मी खूप उत्सुक आहे. तसंच मनात थोडीशी धाकधुकही आहे. जसं की पहिली मालिका लॉंच होताना होतं तसंच काहीसं आताही होतं. माझं पहिलं वहिलं रेस्टॉरंट येत आहे. तर याची उत्सुकता आणि आनंद दोन्हीही आहे”. मृणालच्या नवीन रेस्टॉरंटचं इंटिरिअर अगदीच खास आहे. उत्तम रोषणाई आणि भिंतीवरील हटके फ्रेम्सने या रेस्टॉरंटची शोभा आणखी वाढवली आहे. उत्तम आसनव्यवस्था आणि प्रशस्त जागा हे या रेस्टॉरंटचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकूणच आकर्षक असं हे मृणालचे नवीन रेस्टॉरंट आहे, जिथे अनेक जण अनेक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.
दरम्यान, मृणालने या नवीन व्यवसायासह प्रेक्षकांचे मनोरंजन करायलादेखील सुरुवात केली आहे. लवकरच ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मृणालबरोबर अभिनेता विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे हे कलाकार आहेत. येत्या १६ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल. त्यामुळे मृणालच्या अनेक चाहत्यांची तिला पडद्यावर पुन्हा एकदा भेटण्याची उत्सुकता संपणार आहे.