Upcoming Marathi Movie : मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी ही नेहमीच आशयघन विषय घेऊन येत असते. अशातच एका कौटुंबिक व विनोदी चित्रपटाच्या घोषणेने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘गुलकंद’. नात्यांमधील गोडवा घेऊन या ‘गुलकंद’ चित्रपटाच्या पहिल्या मोशन पोस्टरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. चित्रपटाच्या तगड्या स्टारकास्टसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचं विशेष म्हणजे हास्याची खास मेजवानी. हास्यजत्रेचे बहुतांश कलाकार आणि लेखक-दिग्दर्शक या चित्रपटाचा भाग आहेत.
‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत, ‘वेटक्लाऊड प्रॅाडक्शन्स’ निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॅामेडीचे अनोखे कॅाम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. ‘गुलकंद’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया सांभाळणार आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले की, “या सगळ्यांबरोबर मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॅाण्डिंग आहे आणि आमची हिच केमिस्ट्री चित्रपटातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी कथा आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात. ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे”.
निर्माते संजय छाब्रिया म्हणाले की, “चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला आवडली. मुळात ही एक मुरलेली टीम आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कमाल आहे. आजच्या धावपळीच्या जगात प्रेक्षकांना असे हलकेफुलके विषय पाहायला आवडतात. हा चित्रपट पाहून प्रेक्षक हसतमुखाने थिएटरबाहेर पडतील. आपल्या प्रियजनांबरोबरच्या आठवणी जपण्यासाठी आमचा हा खास प्रयत्न आहे”.