टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर सध्या विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्रीच्या दुस-या लग्नातही अडचणी आल्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या आहेत. दरम्यान पती निखिल पटेलला सोडून अभिनेत्री पुन्हा भारतात परतली असून आई-वडिलांसह राहत आहे. दरम्यान, या अफवांबाबत अभिनेत्रीच्या सोशल मीडिया टीमने असं काही नसल्याचं सांगितलं. दलजीतने इन्स्टाग्रामवरुन निखिलबरोबरचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. इतकंच नव्हे तर दोघांनीही एकमेकांना अनफॉलोही केले आहे. यानंतर आता निखिलनेही तोच मार्ग अवलंबला असल्याचं समोर आलं आहे. पत्नीबरोबरच्या सगळ्या आठवणी त्याने पुसून टाकल्या आहेत. (Dalljiet Kaur Divorce)
दलजीत कौरचा पती निखिल पटेल याचे निकनपटेल नावाचे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. या प्रोफाइलवर त्याचे २६.६ हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय तो स्वत: २६५ लोकांना फॉलो करत आहेत, मात्र त्याच्या या फॉलोच्या यादीत त्याची पत्नी दलजीत कौरचे नाव दिसत नाही आहे. याशिवाय निखिल पटेलनेही इन्स्टाग्रामवरुन त्यांचे लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मुलींबरोबरच्या पोस्ट दिसत आहेत. दलजीतसह एकही फोटो दिसत नाही आहे. यापूर्वी दलजीतनेही निखिलबरोबरचे सर्व फोटो डिलीट केले होते, त्यामुळेच त्यांच्या वेगळे होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता निखिलनेही हे फोटो डिलीट केल्यामुळे या चर्चा आता तीव्र झालेल्या पाहायला मिळत आहेत.
दलजीतचे पहिले लग्न शालिन भानोतसह झाले होते. दोघेही ‘कुलवधू’ मालिकेच्या सेटवर भेटले आणि २००९ मध्ये यांनी लग्न केले. या जोडप्याला जेडेन नावाचा एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाच्या जन्माच्या एका वर्षानंतर दलजीतने शालीनविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. लग्नानंतर शालीन आई-वडिलांसमोर तिच्यावर अत्याचार करत असे, असा आरोपही करण्यात आला.
४० वर्षीय दलजीतने मार्च २०२३ मध्ये व्यावसायिक निखिल पटेलसह लग्न केले. त्यानंतर ती केनियाला शिफ्ट झाली. निखिलही आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुली होत्या. दोघेही आपल्या तीन मुलांसह आनंदाने राहत होते, परंतु लवकरच त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याची चाहूल लागली आहे. दलजीत लवकरच निखिलला घटस्फोट देणार असल्याचे वृत्त आहे.